Tue, Mar 26, 2019 02:19होमपेज › Pune › चाकणमध्ये आंदोलन चिघळले

चाकणमध्ये आंदोलन चिघळले

Published On: Jul 31 2018 1:43AM | Last Updated: Jul 31 2018 1:42AMचाकण : वार्ताहर

मराठा समाजातील राज्यभरातील आंदोलकांचा संयमांचा बांध अखेर सोमवारी अक्षरशः फुटल्याचे चित्र चाकणच्या (ता. खेड) रास्ता रोको आंदोलनात दिसले. सहा तास पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग रोखून प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. संपूर्ण चाकण परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तळेगाव चौकात पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.

सुमारे बारा बसगाड्या, आठ ते दहा खासगी वाहने, पोलिस निवारा केंद्र आंदोलकांकडून जाळून टाकण्यात आले. पोलिस अधिकारी आणि अनेक पोलिस कर्मचारी यात जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत हा हिंसाचार सुरूच होता. आरसीपीच्या सशस्त्र तुकड्या आणि पोलिसांच्या साह्याने बळाचा वापर करीत आंदोलकांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू होते. पुणे-नाशिक महामार्गावर आंबेठाण चौक ते तळेगाव चौकादरम्यान अनेक बसेस पेटविल्यानंतर जमावाने तळेगाव चौकातील पोलिस चौकी पेटवून दिली. पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर आणखी चिडलेल्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलिस, पत्रकार, नागरिक शिवाय अनेक जण जखमी झाले आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी चाकण येथे पुकारण्यात आलेल्या आंदोलनात सोमवारी (दि. 30) सकाळी अकरापासून आंदोलक रस्त्यावर उतरले होते. तळेगाव चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याची हाक या वेळी देण्यात आली. 

स्थानिक नेत्यांची भाषणे संपल्यानंतर साडेअकराच्या सुमारास मराठा युवकांनी आंदोलनाचा ताबा घेत जबरदस्त तोडफोड, जाळपोळ सुरू केली. पाहता पाहता सुमारे दहा-बारा एसटी बस, पीएमपीएमएलच्या बसेस आगीच्या स्वाधीन करण्यात आल्या. पोलिसांनी आंदोलकांचा पवित्रा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा असल्याचे सांगत; रस्त्यातून बाजूला होण्याचे आवाहन केले. मात्र, आंदोलकांनी एकाच गोंधळ आणि राडा घालण्यास सुरुवात केली.

स्थानिक मराठा आंदोलकांनी युवकांना समजावण्याचा अनेकदा प्रयत्न केला; मात्र बाहेरून आलेले तरुण आंदोलक कुणाचेही काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हते.  पुणे ग्रामीणच्या अप्पर पोलिस अधीक्षका तेजस्वी सातपुते घटनास्थळी पोहोचल्या; मात्र आंदोलन अत्यंत आक्रमक असल्याने पोलिसांचा नाईलाज झाला.  संतप्त जमावाने चाकण पोलिस ठाण्याच्या समोर येऊन अनेक वाहने पेटवून दिली. सायंकाळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी चाकणमध्ये पोहोचल्यानंतर आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे. संपूर्ण चाकण परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली असून, शहरात तणावपूर्ण स्थिती कायम आहे.