होमपेज › Pune › व्यवहारांची महत्त्वाची कागदपत्रे जप्त

व्यवहारांची महत्त्वाची कागदपत्रे जप्त

Published On: Feb 25 2018 1:16AM | Last Updated: Feb 25 2018 12:30AMपुणे : प्रतिनिधी

डीएसकेंनी ठेवीदारांचे पैसे परत न करत फसवणूक केल्याप्रकरणात पोलिसांकडून डीएसके यांच्या व्यवहारांमधील महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. त्याआधारे पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान डीएसके दाम्पत्य तपासाला सहकार्य करत नसून, महत्त्वाची माहिती देत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात डी. एस. कुलकर्णी, त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी व मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्या विरोधात ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएसके दाम्पत्याला दिल्लीतून अटक केल्यानंतर पोलिस कोठडी सुनावली. त्याचदरम्यान कोठडीत डीएसके यांना चक्कर आल्याने प्रथम ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी ससून मेडिकल बोर्डाने डीएसके ठणठणीत असल्याचा अहवाल दिल्यानंतर न्यायालयाने त्यांना एक मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

त्यानुसार, पोलिसांकडून या दाम्पत्याकडे तपास सुरू आहे. मात्र, त्यांच्याकडून तपासात सहकार्य मिळत नसून विचारलेली माहिती देत नाहीत. तसेच, आलेला पैसा कुठे गेला, याबाबत विचारल्यानंतर काहीच सांगत नसल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान डीएसके यांचे घर तसेच कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यात एफडी, लोन आणि प्रॉपर्टी प्रोजेक्टची महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यानुसार, पोलिसांकडून या कागदपत्रांच्या आधारे तपास सुरू आहे. दरम्यान, 1 हजार 153 ठेवीदारांच्या फसवणुकीचा आकडा आहे; तर बँकांकडून 2 हजार 892 कोटींचे कर्ज घेतल्याची माहिती आहे.   

पाच हजार तक्रारदार पोलिसांकडे

डीएसके यांच्याविरोधात आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडे 5 हजार तक्रार अर्ज आले आहेत. यात आतापर्यंत एकूण 328 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे; तर वैयक्तिक घेतलेल्या रकमांसदर्भात आलेल्या तक्रारींनुसार 39 कोटी 41 लाख 93 हजार 389 रुपयांची फसवणूक झाली आहे. दरम्यान डीएसके यांच्याविरोधात दररोज तक्रारदार अर्ज घेऊन पोलिसांकडे येत आहेत.