Wed, Aug 21, 2019 14:46होमपेज › Pune › लोकप्रतिनिधींच्या साक्षीनेच बेकायदा प्लॉटविक्री

लोकप्रतिनिधींच्या साक्षीनेच बेकायदा प्लॉटविक्री

Published On: Sep 10 2018 1:17AM | Last Updated: Sep 09 2018 11:48PMदिघी : 

रेड झोन आणि खडी मशिन झोनमध्ये कोणत्याही प्रकारचे अधिकृत बांधकाम करता येत नाही, मात्र तरीही काही इस्टेट एजंट लोकप्रतिनिधींचा फोटो छापून प्लॉटविक्रीची जाहिरात करत आहेत. अशा जाहिरातबाजीला फसून सर्वसामान्य ग्राहक बेकायदा प्लॉट खरेदी करत असून, रेड झोन आणि ग्रीन झोनमधील प्लॉटविक्री करण्यास लॅण्डमाफिया आता चांगलेच सोकावले असून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

काही वर्षांपासून इस्टेट एजंटची टोळी चक्रपाणी वसाहत, सद‍्गुरूनगर, खडी मशिन रस्ता, तळवडे, बोराटे वस्ती, जाधववाडी या भागांत कार्यरत आहे. ज्या जागेवर अधिकृतपणे बांधकाम उभे राहू शकत नाही आणि भविष्यात कधीही विकत घेतलेली जागा ग्राहकांच्या नावावर होऊ शकत नाही, अशी रेड झोन आणि ग्रीन झोनमधील जागा अनधिकृतपणे ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहेत. विशेष म्हणजे या सर्व बेकायदा प्रकाराला राजकीय वरदहस्त मिळत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.

शहरात सध्या फसव्या प्लॉट विक्री करणार्‍यांचा धुमाकूळ सुरू आहे. कसलीही खातरजमा न करता ग्राहक एजंटांच्या भूलथापांना बळी पडत असून, आपल्या आयुष्याची जमापुंजी प्लॉट खरेदीसाठी लावत आहेत. मात्र, रेड झोन किंवा ग्रीन झोनमधील विकत घेतलेल्या जागेवर बांधकाम करण्यास महापालिका परवानगी देत नाही आणि ती जागा ग्राहकांच्या नावावरदेखील होत नाही. त्यामुळे ग्राहकांवर पश्चातापाची वेळ येत आहे. बेकायदा प्लॉटविक्रीतून लाखो रुपये कमावणार्‍या आणि सर्वसामान्य ग्राहकांना लुटणार्‍या इस्टेट एजंट्सना लगाम कधी घालणार, असा संतप्त सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे. 

सर्वसामान्य ग्राहकांची लूट थांबणार कधी?

आपल्या नावाचा, पदाचा कोणी गैरवारप करत असेल तर लोकप्रतिनिधींनी त्यावर आक्षेप घेणे अपेक्षित आहे. तसेच ज्या कामासाठी आपल्या नावाचा वापर केला जातो, त्यामुळे कुणाची फसवणूक तर होत नाही ना? ते काम बेकायदा तर नाही ना? हे तपासणे संबंधित लोकप्रतिनिधीचे काम आहे. परंतु तसे होत नसल्यामुळे अशा प्रकारच्या अनधिकृत धंद्यांना बळ मिळत असून याला जबाबदार कोण? प्रशासकीय यंत्रणा काय करते? असे संतप्त सवाल आता नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

नेत्यांच्या छबीचा असाही वापर

रेड झोन आणि ग्रीन झोनमधील जागेचा व्यवहार हा अनधिकृत समजला जातो, मात्र तरीही काही इस्टेट एजंट राजकीय व्यक्तींच्या नावाचा वापर करून बेकायदा धंदा करत आहेत. प्लॉटविक्रीच्या शुभारंभास स्थानिक मोठ्या नेत्याला बोलवायचे, त्यांच्या नावाचे बॅनर उभारायचे, नेत्यांचे फोटो छापून माहितीपत्रके वाटायची आणि ग्राहकांना आकर्षित करायचे, अशी नवी शक्कल इस्टेट एजंट वापरू लागले आहेत. लोकप्रतिनिधीच्या छबीचा वापर करून अनधिकृत प्लॉटविक्री करण्याचा धंदा आता भोसरी परिसरात राजरोसपणे सुरू आहे.