Fri, Apr 19, 2019 12:30होमपेज › Pune › टॅक्सी चालकांकडून बेकायदा वसुली

टॅक्सी चालकांकडून बेकायदा वसुली

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 03 2018 12:44AMपुणे : प्रतिनिधी 

पुणे स्टेशन आवारात शिरणार्‍या खासगी टॅक्सीचालकांकडून बेकायदा वसुली करण्यात येत असल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पार्किंग कंत्राटदार ओला, उबेर टॅक्सी चालकांकडून बळजबरीने 30 रुपये उकळत असून, दहा मिनिटांपेक्षा अधिक थांबल्यास पैसे घेत असल्याचे दिसून येते. पुणे स्टेशनच्या एक्झिट गेटजवळ कंत्राटदाराचा कर्मचारी टॅक्सी चालकांकडून पैसे घेत असून, पावती देण्यात येत नसल्याची माहिती काही चालकांनी दिली. पहाटे व रात्री उशिरा ही वसुली होत असल्याचे सांगण्यात आले. 

स्टेशन परिसरातील रॅम्प अरुंद असून, तेथे पार्किंग करण्यात येऊ नये म्हणून रेल्वे प्रशासन टॅक्सी चालकांकडून पैसे घेण्याच्या विचारात आहे. मात्र, अद्यापही त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. मात्र त्याआधीच पार्किंग कंत्राटदाराकडून बळजबरीने पैसे उकळले जात आहेत. याबाबत टॅक्सीचालकांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही आमच्या खिशातून पैसे भरत असून, प्रवाशांकडून आम्ही ते घेऊ शकत नाही. आमची ही पिळवणूक असून, रस्त्यावर अवैधरीत्या पार्क करण्यात येणार्‍या रिक्षाचालकांकडून मात्र एक छदामही घेण्याची हिंमत कोणी करत नाही’, अशी प्रतिक्रिया सुशांत गवळी या टॅक्सीचालकाने दिली. पार्किंग कंत्राटदाराकडून बेकायदा वसुली केली जात असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करू, अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे. दरम्यान, पुण्याच्या लोहगाव विमानतळावर 2016 मध्ये चारचाकी वाहनांकडून 7 मिनिटांपेक्षा अधिक थांबल्यास 85 रुपये घेतले जात होते. मात्र, नागरिकांच्या प्रचंड विरोधामुळे हा निर्णय शेवटी मागे घेण्यात आला होता. 

Tags : Pune, Illegal, money, recovery,  taxi drivers