Mon, Aug 19, 2019 01:17होमपेज › Pune › सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे  : प्रतिनिधी 

व्याजाने घेतलेल्या 14 लाख रुपयांच्या बदल्यात 21 लाख रुपये परत केल्यानंतरही पैशांची मागणी करणार्‍या तीन बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणारे व त्यांचे साथीदारांच्या त्रासाला कंटाळून टण्णू (ता. इंदापूर) येथील एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन अनोळखी इसमांसह सात जणांविरुद्ध शनिवार (दि. 25) रात्री उशिरा इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सुजीत जालिंदर घोगरे (रा. गणेशवाडी,  ता. इंदापूर), नीलेश मच्छिंद्र बोडके (रा.पिंपरी बुद्रुक, ता. इंदापूर), सागर राजेंद्र जगदाळे (रा. टण्णू, ता. इंदापूर), दादासाहेब कोकाटे, हनुमंत ज्ञानदेव कोकाटे (दोघे रा. सराटी) व दोन अनोळखी इसम, अशी आरोपींची नावे आहेत.     

अमोल आनंदराव जगदाळे (रा. टण्णू, ता. इंदापूर) यांनी त्यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. माणिक आनंदराव जगदाळे (वय 35 वर्षे, रा. टण्णू) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाराचे नाव आहे.

या प्रकरणाची सविस्तर हकिगत अशी की, घरगुती अडचणीमुळे फिर्यादीने आरोपी सुजीत घोगरे याच्याकडून तीस टक्के व्याजदराने 4 लाख 80 हजार रुपये घेतले होते. नीलेश बोडके याच्याकडून दहा टक्के व्याजाने तीन लाख रुपये, तर सागर जगदाळे याच्याकडून दहा टक्के व्याजाने सात लाख रुपये घेतले होते. त्यापोटी घोगरे यास सात लाख रुपये, बोडके यास पाच लाख रुपये, तर जगदाळे यास नऊ लाख रुपये परत केले होते. 

व्याजासह रक्कम परत करूनदेखील गेल्या एक महिन्यापासून आरोपी आणखी पैसे द्यावेत, यासाठी फिर्यादी व त्याच्या वडील व भावांवर दबाव आणत होते. दीड महिन्यापूर्वी बोडके याने फिर्यादीच्या घरासमोरचे ट्रॅक्टरचे दोन नांगर बळजबरीने उचलून नेले होते. सुजित घोगरे हा चार लाख ऐंशी हजार रुपये द्या, नाही तर एक एकर जमीन आपल्या नावावर लिहून द्या, असे फिर्यादी व त्याच्या वडील व भावांना धमकावत होता. जगदाळे याने फिर्यादीची बुलेट दुचाकी (एमएच 13- 9986) चार ते पाच महिन्यांपूर्वी दारातून उचलून नेली होती. तक्रार केली तर घरदाराला संपवून टाकू, अशी धमकी दिली होती. त्यामुळे घाबरून फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. 

दि.22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बोडके व हरी पवार नावाच्या इसमाने फिर्यादीला सराटी येथून उचलून नेऊन सुरवड गावातील एका खोलीत डांबून ठेवले होते. तुमचा माणूस आमच्या ताब्यात आहे. पैश्याचे काय करता, असा निरोप आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांकडे पाठवला होता. त्यावर एक एकर जमीन विकून 1 डिसेंबरला पैसे देतो, असे बैठकीत ठरवल्यानंतर फिर्यादीची सुटका झाली होती. त्यानंतर आरोपींनी पैश्याच्या कारणावरून फिर्यादीचा भाऊ विक्रम यास बेदम मारहाण केली. त्याबद्दलची फिर्यादीच्या आई-वडिलांची तक्रार बावडा पोलिसांनी घेतली नाही, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

आमच्या विरुद‍्ध तक्रार देतोस काय, असे म्हणून फिर्यादी व त्याचा भाऊ माणिक यांना आरोपींनी चारचाकी वाहनातून टेंभुर्णी (जि. सोलापूर) शेताचा उतारा आणण्यासाठी घेऊन गेले. तेथून  इंदापूरला आले. त्याच्या वडिलांकडून बळजबरीने जमिनीची इसार पावती करून घेतली.  या वेळेपासून फिर्यादी व त्याचे नातलग या इसमांच्या दहशतीखाली होते. त्यातूनच दि.23 नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजता फिर्यादीचा भाऊ माणिक जगदाळे याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस निरीक्षक सजन हंकारे  तपास करीत आहेत.