Mon, Aug 19, 2019 09:16होमपेज › Pune › सत्ताधार्‍यांचा रंगांचा नामफलक बदलला

सत्ताधार्‍यांचा रंगांचा नामफलक बदलला

Published On: Aug 05 2018 1:31AM | Last Updated: Aug 05 2018 12:40AMपिंपरी : प्रतिनिधी

भाजप नगरसेवकांच्या नावाच्या फलकावर बेकायदेशीरपणे झेंड्यांचे रंग असलेले फलक लावले होते. त्याबाबत मनसेच्या वतीने रूपेश पटेकर यांनी आयुक्‍तांना निवेदन देऊन हे फलक काढण्याची मागणी केली होती. त्यानुसार आयुक्‍तांनी नुकताच अध्यादेश काढून महापालिकेच्या पैशातून नामफलकाचा खर्च नको, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सत्‍ताधार्‍यांचा रंगाचा नामफलक बदलला आहे. रूपेश पटेकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या बाबत ‘पुढारी’मध्येही सविस्तर वृत्त देण्यात आले होते.

नागरिकांच्या पैशांतून सत्‍ताधारी पक्ष आपली मनमानी करताना दिसत आहे. रंग असणारे नावाचे फलक लावण्यात आले होते. याबाबत पटेकर यांनी आयुक्‍तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले होते की, भाजपला सत्‍ता मिळाल्याने नगरसेवकांचे लाड पुरविण्यासाठी प्रशासनाकडून नियम पायदळी तुडवले जात आहेत. पक्षवाढीच्या हट्टासाठी नगरसेवकांची निवासस्थाने, जनसंपर्क कार्यालये याकडे जाण्यासाठी लावलेल्या दिशादर्शक पाट्यांचा रंग भाजपच्या झेंड्यासमान आहे. हे बेकायदेशीर आहे. भाजप नगरसेवकांच्या मागणीचा विचार करता महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून प्रत्येकी पाच ते सहा दिशादर्शक फलक देण्यात आले आहेत.

या फलकांचा रंग भाजपच्या हिरव्या झेंड्याप्रमाणे अर्धा हिरवा तर अर्धा केशरी असा आहे. या फलकांवर सुमारे 4 कोटी रुपयांचा खर्च झाला असल्याचा आरोप पटेकर यांनी केला. हे फलक त्वरीत काढण्याची मागणी त्यांनी केली.  त्यानूसार आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी नुकताच अध्यादेश काढला. त्यामध्ये नमूद केले आहे की, शहराच्या सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने फलकांच्या संख्येबाबत व फलक कशा प्रकारचा असावा, या बाबत धोरण नसल्याने शहरात विविध प्रकारात तसेच विविध संख्येत सदरचे फलक लावलेले दिसून येत आहेत. याबाबत विविध सामाजिक, राजकीय संस्था व नागरिकांच्या तक्रारी महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे प्राप्‍त होत आहे. त्यानुसार नगरसेवकांनी निवासस्थानाबाबतची माहिती दर्शविणारे प्रत्येकी दोन फलक लावण्यात यावेत. इतर फलक काढून टाकण्यात यावा. 

फलकांचा आकार 0.9 बाय 0. 60 मीटर असावा. हिरव्या पार्श्‍वभूमीवर पांढर्‍या रंगाच्या अक्षरात नगरसेवकांच्या निवासस्थानाबाबतची माहिती दर्शविणारा असावा, अशा सूचना आयुक्‍तांनी अध्यादेशाद्वारे दिल्या आहेत. त्यानुसार नगरसेवकांनी नावाचे फलक बदलले आहेत.