Fri, Jul 19, 2019 20:13होमपेज › Pune › दारू अड्ड्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष

दारू अड्ड्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 1:07AMपुणे : पुष्कराज दांडेकर 

शहरात मागील काही महिन्यांपासून खुलेआम दारू पिणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. नशेत स्वत:वरील ताबा गमविणार्‍या तरुण मद्यपींकडून  खून, खुनाचा प्रयत्न करणे, तरुणी, मुली, महिलांची छेडछाड असे गुन्हे हे  केले गेले आहेत.  उपनगरांमध्ये असलेली मोकळी, निर्जन, अंधार असलेली मैदाने, रस्त्यावरील पदपथ,खाद्यपदार्थांच्या हातगाड्या हेच सध्या दारूचे पिण्याचे अड्डे बनले आहेत. त्याकडे पुणे पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याने हे गंभीर गुन्हे घडले आहेत. 

कात्रज, धायरी, हडपसर, खडकी, सहकारनगर, दत्तवाडी, सिंहगड रस्ता, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, विश्रांतवाडी, येरवडा या ठिकाणी असलेल्या मोकळ्या मैदानात तसेच हातगाड्यांवर दारू पिण्याचे अड्डे बनले आहेत. तर काही परिसरांमध्ये सुरु असलेल्या चायनीज व फास्ट फुडच्या दुकानांमध्ये दारूच्या दुकानांमधून दारू आणून काही किरकोळ रक्कम देऊन मद्यपींना तेथे जाऊन बसता येते. या अड्ड्यांना काही वेळा चिरीमीरी देऊन चालवले जाते, अ असे एका चायनीज अन्नपदार्थ विक्रेत्याने सांगितले. तर सिंहगड रस्त्यावर असलेल्या अन्नपदार्थाच्या गाड्यांवर देखील खुलेआम दारू प्यायली जाते. यावेळी तेथून जाणार्‍या महिला, तरुणी यांची छेडछाडीच्या घटनाही घडल्या आहेत. या परिसरात राहणारे नागरिक गुंड प्रवृत्तीच्या मद्दपींच्या दहशतीमुळे याची तक्रार करत नाहीत. तर काही ठिकाणचे दारू अड्डे हे राजकिय क्षेत्रातील लोकांच्या व पोलिसांच्या वरदहस्तामुळे सुरू असतात. 

पोलिस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या नर्जन मैदाने, अन्न पदार्थांच्या हातगाड्या आणि हॉटेलमध्ये सर्रासपणे मद्यप्राशन केले जाते. यावेळी पोलिसांनी या ठिकाणी गस्त घालून हे अड्डे उद्ध्वस्त करणे गरजेचे आहे. बहुतेक खून हे रात्रीच्या वेळी दारू पिऊन फिरणार्‍या मद्दपींमध्ये झालेल्या भांडणांतून झालेले आहेत.  महिलांच्याही सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. त्यामुळे या खुलेआम असलेल्या दारू अड्ड्यांवर कारवाई होणार का आणि पोलिस या परिसरात गस्त घालणार का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. पोलिसांनी अशा अड्ड्यांवर बसणार्‍यांवर कारवाई केली तर काही प्रमाणात या गुन्ह्यांना अटकाव घालता येईल. त्यामुळे पोलिसांनी या प्रकारांना गांभीर्याने घेत कारवाई केली तर त्यांचीच डोकेदुखी कमी होईल.