Thu, Apr 25, 2019 13:34होमपेज › Pune › विरोधी पक्षनेते कार्यालयाकडे दुर्लक्ष

विरोधी पक्षनेते कार्यालयाकडे दुर्लक्ष

Published On: Jun 29 2018 12:56AM | Last Updated: Jun 29 2018 12:32AMपिंपरी  : मिलिंद कांबळे 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौरांनंतर अधिक सन्मानाचे पद विरोधी पक्ष नेत्याचे आहे. पालिका प्रशासन नियमानुसार विरोधी पक्षनेत्याना सर्व प्रशासकीय सुविधा उपलब्ध करून देते. मात्र, सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात विरोधी पक्षनेत्याच्या दालनाकडे हेतूपरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे. 

पालिकेच्या स्थायी समितीसह विविध विषय समिती सभापतीची निवड नुकतीच झाली आहे. हे सर्व सभापती सत्ताधारी भाजपचे आहेत. त्यांची नावे त्यांच्या दालनाच्या नामफलकावर तातडीने लावली गेली आहेत. तसेच, सर्व 9 सदस्यांची नावे व मागील सभापतीचे नाव दालनातील फलकावर नोंदविले गेले आहेत. त्याचबरोबर सत्ताधारी भाजपचे पदाधिकार्‍यांचे बदलेल्या पदानुसार नवे लोखंडी नामफलक त्यांच्या प्रभागातही चौका-चौकांत आणि गल्लोगल्ली लावले गेले आहेत. विशेष म्हणजे सत्ताधार्‍यांचे नामफलक बदलण्यात पालिका प्रशासनाने चपळाई दाखविली आहे. मात्र, विरोधी पक्षनेते दालनाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केल्याचे दिसत आहे. त्यांच्या दालनातील आतापर्यंत होऊन गेलेल्या विरोधी पक्षनेत्याचा नामफलक आहे. त्या नामफलकावर दीड महिना उलटूनही मागील विरोधीपक्षनेते योगेश बहल यांचे नाव नोंदविले गेलेले नाही. पालिका इतिहासामध्ये बहल हे 28 वे विरोधी पक्षनेते ठरले आहेत. 

तसेच, सन 2005 ते 2007 या काळात विरोधी पक्षनेते असलेले शाम लांडे यांच्या समोरील 18 क्रमांक बुजविण्यात आला आहे. तर, त्यानंतर झालेल्या विरोधी पक्षनेत्याचे नाव अद्यापही रिकामेच आहे. सध्या दत्ता साने विरोधी पक्षनेते आहेत. त्यांची निवड 17 मे रोजी झाली आहे. त्याना ‘हेटरहेड’ व ‘व्हिजीटींग कार्ड’ देण्याची प्रक्रिया प्रशासनाने तातडीने पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाने तीन दिवसांपूर्वी 10 पैकी केवळ 5 हेटरहेड दिले आहेत.  याबाबतची तक्रार त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.  तर, व्हिजीटींग कार्डमध्ये चुका झाल्याने ते त्यांनी परत केले आहेत. या कृतीवरून पालिका प्रशासन सत्ताधारी पदाधिकारी व विरोधकांना वेगळा न्याय देत असल्याचे धक्कादायक बाब देत असल्याचे समोर आले आहे.