Wed, May 22, 2019 10:14होमपेज › Pune › काचबिंदूकडे दुर्लक्ष केल्यास कायमचे अंधत्व

काचबिंदूकडे दुर्लक्ष केल्यास कायमचे अंधत्व

Published On: Mar 18 2018 1:06AM | Last Updated: Mar 17 2018 11:33PMपिंपरी : वर्षा कांबळे

डोळे येणे, रांजणवाडी, मोतीबिंदू, डोळ्यांसबंधी साधारणपणे एवढेच आजार आपल्याला ठाऊक असतात. मात्र, काचबिंदू या गंभीर आजाराविषयी अद्यापही फारशी जनजागृती झाली नसल्यामुळे याची विशेष माहिती कुणालाच नाही. काचबिंदू हा एक सुप्त आजार आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाची दृष्टी पूर्णपणे जाऊ शकते.  11 ते 18 मार्च या कालावधीत काचबिंदू सप्ताह राबविला जातो. यानिमित्त घेतलेला हा  आढावा.

काचबिंदू हा आजार ग्लॉकोमाला नावाने परिचित आहे. डोळ्यातील नेत्रजलाचा निचरा नीट होत नसल्यास नेत्रदाब वाढतो व दृष्टी मज्जातंतूत बिघाड होऊन विशिष्ट प्रकारचा द‍ृष्टिदोष उद्भवतो, यालाच काचबिंदू  असे म्हणतात. 

उच्च रक्तदाब व मधुमेह यांच्यासारखाच काचबिंदू हा एकदम बरा होणारा आजार नाही. तो फक्त ताब्यात ठेवला जाऊ शकतो. त्यासाठी नेत्रदाब सतत ताब्यात राहायला हवा. नाहीतर कुठल्याही प्रकारचा काचबिंदू असो त्याचा शेवट अंधत्वात होतो. काचबिंदू बरा होत नाही. जगात कुठेही त्यावर रामबाण इलाज झालेला नाही. जसा मधुमेह बरा होत नाही; पण नियंत्रणात ठेवता येतो  तसेच काचबिंदूच्या बाबतीत आहे. काचबिंदू पूर्ण नेत्र तपासणीशिवाय निदान होणे शक्य नसते. काचबिंदूचे थेंब आयुष्यभर घालावे लागतात. काचबिंदूचे ऑपरेशन झालेले असले, तरी दर सहा महिन्याला तपासणी करावी लागते.

बर्‍याच व्यक्तींना डोळ्यांचे काही विकार झाल्यास चष्मा लागला असे वाटते. त्यामुळे नेत्र तपासणीसाठी दुर्लक्ष किंवा उशीर केला जातो. बर्‍याचदा चष्म्याबरोबरच काचबिंदू हा आजार देखील असू शकतो. बर्‍याच व्यक्तींना काचबिंदू झाल्यावर सुरुवातीला कोणताच त्रास होत नाही. मात्र, जेव्हा त्रास सुरू होतो तेव्हा बराच उशीर झालेला असतो. 

काचबिंदू कोणाला होऊ शकतो 

चाळीस वर्षांपेक्षा जास्त वय असणे, कुटुंबात काचबिंदू किंवा आंधळेपणा असल्यास, मधुमेह, थॉयरॉईड ग्रंथीचे आजार, मोठ्या नंबरचा चष्मा असलेल्यांना काचबिंदू होऊ शकतो. 

लक्षणे 

नजर कमजोर होणे, डोळ्यांना धुरकट दिसणे, डोकेदुखी, डोळ्यांसमोर वलये दिसत असल्यास, डोळा दुखत असल्यास काचबिंदू होण्याची शक्यता असते.  तुम्हाला यापैकी एक जरी धोक्याचा घटक सतावत असेल, तर काचबिंदू तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

काचबिंदू आजाराविषयी रुग्ण फारसे गंंभीर नसतात. साधारणत: एक हजारामागे दहा व्यक्तींना काचबिंदू आजार होतो. शहरामध्ये दिवसाला दोन काचबिंदूचे रुग्ण येतात. सध्या एक हजार काचबिंदूचे रुग्ण उपचार घेत आहेत. काचबिंदूच्या रुग्णांनी नियमित तपासणी करणे आणि औषधोपचार घेणे आवश्यक आहे; तसेच सर्वसामान्य व्यक्तींनीही काचबिंदूसाठी पेरीमेट्री तपासणी वर्षातून एकदा करणे गरजेचे आहे. - डॉ. अभिजित आग्रे, नेत्रतज्ज्ञ, अध्यक्ष  इन्साईट इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थल्मॉजी

 

Tags : Cataracts, Cataracts Ignorance, permanently blindness,