Tue, Apr 23, 2019 22:45होमपेज › Pune › गर्भपात करायचाय, तर मोजा पाच ते दहा हजार

गर्भपात करायचाय, तर मोजा पाच ते दहा हजार

Published On: Feb 19 2018 1:37AM | Last Updated: Feb 19 2018 12:47AMपुणे : ज्ञानेश्‍वर भोंडे

अडचणीत आलेल्या दांपत्याला भीती दाखवून गर्भपातासाठी आवाच्या सवा रक्कम उकळण्याचा ‘गोरख धंदा’ खासगी गर्भपात केंद्रांमध्ये जोरात सुरू असल्याचे समोर येत आहे. असेच एक प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे.

संतती प्रतिबंधक साधने वापरूनही गर्भ राहिल्याची शक्यता असल्याने, एक विवाहित जोडपे गेल्या आठवडयात सिंहगड रोडवरील एका गर्भपात केंद्रांमध्ये चौकशीसाठी गेले. तेथील डॉक्टरांनी सोनोग्राफी करावयास लावली असता, सोनोग्राफीमध्ये पाच आठवडयाचा गर्भ असल्याचे निदान झाले. गर्भ नको असल्याने जोडप्याने गर्भपात करण्यासंदर्भात डॉक्टरांना विचारले. गर्भपात करण्याचे दर ऐकले तेव्हा मात्र दांपत्याच्या पायाखालील जमीनच हादरली.

कारण पाच आठवडे व तीन दिवस झालेला गर्भ गर्भपाताच्या गोळयांनी काढून टाकण्यासाठी तीन हजार आठशे रुपये लागतील, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यामध्ये गोळयांचा खर्च आणि सोनोग्राफीचेही हजार रुपयेही वेगळेच. तेही पाच आठवड्याच्या आतील गर्भ आणि पाच आठवडे उलटून गर्भ सहा आठवडयांचा झाला असेल तर त्यासाठी पिशवी साफ करून घ्यावी (क्युरेटिंग) लागेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यासाठी तब्बल आठ हजार रुपये खर्च सांगितला गेला. याचबरोबर गोळयांनी अर्धवट गर्भपात झाला तर परत पिशवी साफ करून घ्यावी लागेल, असेही सांगायला हे डॉक्टर विसरले नाहीत. याचाच अर्थ कमी दिवसांचा गर्भ काढून टाकण्यासाठी गोळयांचे प्रिस्क्रिप्शन लिहून देउन घरच्या घरी (डॉक्टरांच्या सल्यानुसारच) सहजासहजी गर्भपात होत असताना, रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात आहेत.

तसेच सात आठवडयापर्यंतच्या गर्भाचा गर्भपात गोळयांनी होत असतानादेखील तो केवळ सहा आठवडयातच होत असल्याचे सांगून, गर्भ पिशवी साफ करण्यास भाग पाडून पैसे उकळले जात असल्याचे दिसून येत आहे. थोडा फार फरक वगळता सर्वच खासगी गर्भपात केंद्रांकडून हा प्रकार सूरू आहे. यामुळे नागरिकांना महापालिकेचे प्रसूतीगृहे, सरकारी रुग्णालये येथील गर्भपात केंद्रांमध्येच मोफत गर्भपात करता येणे शक्य आहे. 

सात आठवडयापर्यंतचा गर्भपात हा गोळयांनी होतो. मात्र या गोळया केवळ स्त्रीरोगतज्ज्ञाने दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर मिळतात आणि त्यांनी सांगितल्यानुसारच त्या घेणे अपेक्षित आहे. दरम्यान, या गोळया घेतल्यानंतर पाच दिवस ते आठवडाभर अंगावरून जाते. मात्र अंगावरून जास्त दिवस गेले, किंवा जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाला, तर वैद्यकिय उपचार घेणे गरजेचे आहे. यानंतर डॉक्टर त्या रुग्णाची सोनोग्राफी करून काही अंश शिल्लक असल्यास तो छोटी शस्त्रक्रिया करून काढतात, अशी माहिती ससून रुग्णालयाचे वरिष्ठ स्त्रीरोग व प्रसूतीरोग तज्ज्ञ डॉ. रमेश भोसले यांनी दिली. 

गर्भपातासाठी घ्यावयाची काळजी

सात आठवडयाच्या आतील गर्भपात घरच्या घरी गोळयांनी होउ शकतो. याच्या गोळयांचे प्रिस्क्रिप्शन फक्त स्त्रीरोगतज्ज्ञच देउ शकतात.
सात ते 12 आठवडयापर्यंतचा गर्भपात करण्यासाठी क्युरेटिंग करणे आवशक.
12 ते 20 आठवडयापर्यंतचा गर्भपात हा दोन स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा लागतो. हा गर्भपात म्हणजे एक प्रकारचे छोटे बाळंतपणच असते
20 आठवडयांवरील गर्भपात हा न्यायालयाने परवानगी दिली तरच करता येउ शकतो.