Mon, Nov 19, 2018 08:21होमपेज › Pune › कोणाला आक्षेप असल्यास न्यायालयात जाण्यास मुभा : सतीश माथूर

कोणाला आक्षेप असल्यास न्यायालयात जाण्यास मुभा : सतीश माथूर

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 10 2018 1:35AMपुणे : प्रतिनिधी 

माओवादी समर्थकांविरोधात पोलिसांकडे ठोस पुरावे असून ते न्यायालयात सादर केले आहेत. याबाबत कोणाला आक्षेप असल्यास त्यांना न्यायालयात जाण्यास मुभा आहे, असे राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने उभारण्यात येणार्‍या शाळेचे भूमिपूजन तसेच पाळणाघराचे उद्घाटन माथूर यांच्या हस्ते करण्यात आले़  यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते़  पुण्यातील एल्गार परिषदेच्या आयोजकांचे माओवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबतचे ठोस पुरावे पोलिसांकडे आहेत. ते न्यायालयात सादर केले आहेत. याबाबत कोणाला काही काही आक्षेप असल्यास त्यांना न्यायालयात जाण्यास मुभा आहे. राजीव गांधी यांच्या हत्येप्रमाणे देशातील मोठ्या राजकीय व्यक्तीला मारण्याचा कट आखल्याचे पोलिसांनी जप्त केलेली कागदपत्रे व इलेक्ट्रॉनिक साहित्यातील माहितीवरून स्पष्ट होते़  त्याबाबतची तपासातील पत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत़  पोलिसांची कारवाई संशयास्पद व राजकीय हेतूने केली जात असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे, असे विचारल्यावर सतीश माथूर म्हणाले, पोलिसांकडून कोणालाही कुठलेही पत्र दिले गेलेले नाही.

माओवाद्यांचे आपापसात संभाषण आणि संपर्क झाला आहे. माओवाद्यांच्या समर्थकांकडूनच ती व्हायरल झाली असावीत़  तसेच मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.  तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून या प्रकरणात काही तपासात मदत घेतली जात आहे का, याबाबत विचारले असता माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. राज्यातील पोलिस अधिकार्‍यांच्या दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात बदल्या होत असतात़  या बदल्यांबाबतही त्यांनी बोलण्यास नकार दिला.