Fri, Jul 10, 2020 22:24होमपेज › Pune › मागण्या मान्य न झाल्यास संमेलन उधळून लावू

मागण्या मान्य न झाल्यास संमेलन उधळून लावू

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 15 2017 1:29AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विरोधी कृती समितीने मराठी वाङ्मय परिषदेच्या अध्यक्षांना एका पत्राद्वारे काही मागण्या केल्या आहेत. त्या मागण्या मान्य न झाल्यास हे संमेलन होऊ देणार नाही, असा इशारा या पत्राद्वारे या समितीने दिला आहे. त्यामध्ये, ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला..’ या विधानाने जेव्हा संमेलनाची सुरवात होईल तेव्हाच संमेलन घ्यावे, रिद्धपूर (जिल्हा अमरावती) येथे तत्काळ मराठी विद्यापीठ स्थापन करावे, अशा काही मागण्याचा समावेश आहे.

या पत्रातील आशयामध्ये म्हटले आहे की, 140 वर्षांपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जी जत्रा भरते, तिचे सामाजिक आणि सांस्कृतिक फलित काय? कुठल्याही अमानुष सत्तेला आणि दमन यंत्रणेला साहित्यिकांची भीती वाटली पाहिजे. मात्र, असे न होता उलट साहित्यिकच राजकारण्यांची भाटगिरी करताना दिसतात. प्रशासनाकडून मराठी भाषेची मान मुरगळली जात असताना हे साहित्यिक अजिबात अस्वस्थ होत नाहीत. उलटपक्षी अशी उत्सव भरवून जनतेच्या पैशावर मौजमजा करतात. हे प्रचंड असंवेदनशीलपणाचे लक्षण आहे.

जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आम्ही साहित्य संमेलन होऊ देणार नाही. आमचा विरोध डावलून संमेलन घेण्याचा प्रयत्न झाला तर तो आम्ही उधळून लावू याची पूर्वसूचना आपणास देत आहोत, अशी तंबी या समितीने पत्राद्वारे दिली आहे. साहित्य महामंडळ आणि प्रशासनाने आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी समितीतर्फे प्रा. सुदाम राठोड (अहमदनगर), डॉ. मनोज मुनेश्‍वर (नांदेड), डॉ. दैवत सावंत (बुलढाणा), प्रा. प्रतिमा परदेशी (पुणे), दयानंद कतकदंडे (पुणे) यांनी केली आहे.