Sat, Mar 23, 2019 16:37होमपेज › Pune › राजकारण न जमल्यास जाणार चित्रपटसृष्टीत : आठवले

राजकारण न जमल्यास जाणार चित्रपटसृष्टीत : आठवले

Published On: Jan 26 2018 1:22AM | Last Updated: Jan 25 2018 10:56PMपुणे : प्रतिनिधी 

मी राजकारणामध्ये सक्रिय असलो तरी मला चित्रपटसृष्टी आवडते. जर राजकारणात आलो नसतो तर मी चित्रपटसृष्टीतच गेलो असतो आणि भविष्यात जर मी राजकारणात अयशस्वी झालो तर चित्रपटसृष्टीत जाणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. सिम्बायोसिस आंतराष्ट्रीय विद्यापीठामध्ये आयोजित सिम्बायोसीस सांस्कृतीक महोत्सवाचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, अभिनेत्री निवेदिता बसु, डॉ. भरत बलवल्ली उपस्थित होते. 

आठवले म्हणाले, माझी पार्टी ही फक्त दलित समाजाची पार्टी नसून त्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या व्यक्तींना स्थान आहे. चित्रपट क्षेत्रातील लोकांना जरी माझ्या पार्टीत यायचे असेल तर त्यांचे स्वागतच आहे. तसेच दलित, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता  मराठा, ब्राम्हण समाजाला सुध्दा आरक्षण मिळाले पाहीजे. या समाजामध्ये सुध्दा गरीब लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांना आरक्षणाचा फायदा झाला पाहीजे. यासंदर्भात पंतप्रधानाशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सिम्बायोसीस विद्यापीठातील विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सलग अठरा अठारा तास अभ्यास करत असल्याचे सांगत तुम्ही किमान चार तास तरी रोज अभ्यास करावा असा सल्ला दिला.  

डॉ. मुजुमदार म्हणाले, सिम्बायोसिस विद्यापीठामध्ये नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ग्रंथालय उभारण्यात आले आहे. यासाठी आठवले यांनी सहकार्य केले. विद्यापीठामध्ये अनेक कार्यक्रम होतात मात्र, सांस्कृतीक कार्यक्रम देखील व्हावा या उद्देशाने दरवर्षी सिम्बायोसीस सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन केले जाते. उद्घाटन समारंभानंतर ‘शर्मिला टागोर संगीत रजनी’या कार्यक्रमातून शर्मिला टागोर यांचा सुवर्णकाळ संवाद, गाणी आणि चित्रपटातील प्रसंगांतून उलगडला. प्रा. अनुपम सिद्धार्थ यांनी मुलाखतीतून त्यांच्या संपूर्ण जीवनपटावर प्रकाश टाकला. मुलाखतीदरम्यान कलाकारांनी टागोर यांची कोरा कागज था ये मन मेरा, ये देख के दिल झुमा, गुनगुना रहे है, दिल ढुँढता है फिर वही, अब के सजन सावन में, चलो सजना जहा तक घटा चले, हम तुम जुदा ना होंगे अशी गाजलेली गाणी सादर करत वातावरणात रंग भरले. त्यांच्या निवडक चित्रपटांतील प्रसंगही मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले. 

फडणवीसांना चांगले संबंध ठेवावेच लागतात

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुजुमदार यांना तुम्हाला जर शैक्षणिक क्षेत्रात काही मदत लागली तर सांगा माझे आणि पंतप्रधानांचे चांगले संबंध आहेत. माझे आणि शिक्षणमंत्री जावडेकर यांचेही चांगले संबंध आहेत. तर मुख्यमंत्री फडणवीस यांना माझ्याशी चांगले संबंध ठेवावेच लागत असल्याचे सांगितले. त्यांच्या या वाक्यावर मात्र उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पीकला