होमपेज › Pune › पंढरपूरला गेलो तर गुपचूप दर्शन घेतो : पवार

पंढरपूरला गेलो तर गुपचूप दर्शन घेतो : पवार

Published On: Jul 09 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 1:04AMपुणे : प्रतिनिधी

मी आतापर्यंत वारीला कधी गेलो नाही. मला कुठल्याही गोष्टीचे अवडंबर केलेले आवडत नाही. पण कधी पंढरपूरला गेलो तर मी गुपचूप दर्शन घेऊन येतो. वर्तमानपत्रात अथवा टीव्हीवर आपला फोटो यावा, अशी माझी कधीच अपेक्षा नसते, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भावना व्यक्‍त केली.हभप शामसुंदर सोन्नर लिखित ‘उजळावया आलो वाटा’ या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या समारंभाला  बापूसाहेब महाराज देहूकर,  राजाभाऊ चोपदार,  सुभाष वारे, प्रकाश परांजपे, अविनाश पाटील व शामसुंदर सोन्नर आदी  उपस्थित होते.  यावेळी शरद पवार म्हणाले, मी कधी वारीला जात नाही. मात्र, मला त्याबद्दल अनादर नाही. मी मुख्यमंत्री असताना कधीही शासकीय पूजा चुकवली नाही. 

ते  म्हणाले, समाजात विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजविण्यासाठी संतांची कामगिरी महत्त्वाची होती. कष्टकरी, श्रमिक वर्गाचा विठ्ठल हा मानसिक, बौद्धिक, शारीरिक आधार आहे. समाजाला एकसंध ठेवण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले आहे. कीर्तनाला मोठी परंपरा असून संत नामदेवांनी ती देशभर नेली. कीर्तन हे समाजप्रबोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचे साधन आहे.  शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही विविध माध्यमांतून उपाययोजना केल्या. मात्र  शेतकर्‍यांमध्ये जगण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, त्यांची जगण्याची उमेद वाढविण्यासाठी  कीर्तनाच्या माध्यमातून मोठे काम मराठवाड्यात झाले. महिलांना समान अधिकार मिळावा याची शिकवण कीर्तनाद्वारे देण्यात येत आहे. कर्तृत्व हे फक्त पुरुषांमध्ये नसते, तर महिलांमध्येदेखील असते. त्यामुळे  त्यांचा आदर व्हायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

आंबे खाऊन मुले होतात!

‘नाव साकारणे होती पुत्र, तर का करणे लागे पती’ असे सांगत संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले, असे तुकाराम महाराजांचे वंशज देहूकर सांगत असतानाच खुर्चीवर बसलेल्या पवार यांनी त्यावर तत्काळ, आंबे खाऊन मुले होतात, असा टोमणा संभाजी भिडे यांना नाव न घेता लगावला.