Sun, Apr 21, 2019 14:27होमपेज › Pune ›  मृत्यूनंतरही आईला तिचा मुलगा मिळाला परत 

 मृत्यूनंतरही आईला तिचा मुलगा मिळाला परत 

Published On: Feb 14 2018 9:30PM | Last Updated: Feb 14 2018 9:30PMपुणे : प्रतिनिधी

आयव्हीएफ’च्या तंत्रज्ञानामुळे २०१६ मध्ये मृत्‍यू झालेला मुलगा २०१८ मध्ये त्‍याच्या आईला परत मिळाला आहे. ब्रेन ट्युमरमुळे प्रथमेश पाटील या 27 वर्षांच्या तरुणाचे जर्मनीमध्ये गोठवलेले वीर्य वापरुन आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सरोगेट मदरद्वारे एक मुलगा आणि मुलगी असे जुळे जन्माला आले आहेत. 

प्रथमेश जर्मनीमध्ये मास्टर्स डिग्रीचे शिक्षण घेण्यासाठी गेला असताना तेथे त्याला ब्रेन ट्युमर आणि 4 थ्या टप्प्यातील कर्करोग झाला असल्याचे निदान झाले. जर्मनीतील डॉक्टरांनी प्रथमेशला केमोथेरपी व रेडिएशन उपचार केले. उपचारादरम्यान त्यांनी प्रथमेशला त्याचे वीर्य गोठवून ठेवण्यासही (क्रायोप्रिझर्व्हेशन) सांगितले. प्रथमेशला येत असलेल्या झटक्यांमध्ये त्याची दृष्टीही कायमची गेली. दरम्यान त्याची आई राजश्री पाटील या जर्मनीला जाऊन त्यांनी प्रथमेशला भारतात आणले. त्याला  मुंबईतील एका रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारांनंतर प्रथमेशचे आरोग्य सुधारु लागले मात्र, घातक ट्युमरने अखेर त्याचा बळी घेतला.

प्रथमेशच्या मृत्यूनंतर आपल्या मुलाला परत मिळवण्याच्या प्रबळ इच्छेने राजश्री पाटील यांनी जर्मनी सिमेन बँकेशी संपर्क साधला, जेथे प्रथमेशने आपले वीर्य गोठवून ठेवले होते. त्यांनी त्याबाबतची औपचारिकता पूर्ण करुन प्रथमेशचे वीर्य भारतात आणले व नगर रोड येथील सह्याद्री हॉस्पिटलमधील आयव्हीएफच्या मदतीने ते वीर्य एका सरोगेट मातेच्या गर्भाशयात सोडण्यात आले असता त्यापासून एक मुलगा आणि एका मुलीने जन्म घेतले.

नगर रोड येथील सह्याद्री हॉस्पिटलच्या आयव्हीएफ विभागाच्या प्रमुख डॉ. सुप्रिया पुराणिक म्हणाल्या, ‘‘मला हा प्रसंग एरवीपेक्षा वेगळा होता. प्रथमेशच्या आईने या संपूर्ण प्रक्रियेत दाखवलेले धैर्य खरोखर प्रशंसनीय आहे.