Thu, Jan 17, 2019 10:27होमपेज › Pune › ‘आयटीआय’चे कालबाह्य अभ्यासक्रम होणार बंद

‘आयटीआय’चे कालबाह्य अभ्यासक्रम होणार बंद

Published On: Jun 21 2018 1:21AM | Last Updated: Jun 21 2018 12:52AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यातील औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विद्यार्थ्यांची मागणी नसलेले कालबाह्य अभ्यासक्रम यंदापासून बंद होणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. यामध्ये कटिंग-सुईंग, बेसिक कॉस्मॅटोलॉजी, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅम असिस्टंट, फाऊंड्री, कारपेंटर आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तर यंदा पहिल्यांदाच आयटीआय प्रवेशासाठी अँड्रॉईड अ‍ॅप विकसित करण्यात आले असून प्रवेशासाठी तब्बल अडीच लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती ‘आयटीआय’मधील सूत्रांनी दिली आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून साधारण 61 ट्रेडसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज मागविण्यात येतात. परंतु संचालनालयाने गेल्या काही वर्षातील ‘आयटीआय’मधील प्रवेशप्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर काही निष्कर्ष समोर आले आहेत.  या अभ्यासक्रमांना एकास तीन किंवा चार विद्यार्थीही अर्ज करत आहेत. त्यामुळे मागणी नसलेले अभ्यासक्रम बंद करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे देण्यात आला आहे. 

अभ्यासक्रम बंद झाल्यानंतर तेथील कर्मचारी व सामग्री इतर ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा काही कालबाह्य अभ्यासक्रम बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले असून प्रस्तावावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आयटीआय प्रवेशाचे अ‍ॅप पहिल्यांदाच विकसित...

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी महा आयटीआय हे अँड्राईड अ‍ॅप विकसित केले आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर उपलब्ध असल्याचे संचालनालयाकडून कळविण्यात आले आहे.