होमपेज › Pune › आयटीआयच्या पाच हजार जागा वाढणार

आयटीआयच्या पाच हजार जागा वाढणार

Published On: Jun 04 2018 1:30AM | Last Updated: Jun 04 2018 12:59AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयच्या प्रवेशामध्ये यंदा तब्बल पाच हजार जागांची वाढ होणार आहे. यातील अडीच हजार जागांची वाढ झाली असून येत्या आठ दिवसांमध्ये आणखी अडीच हजार जागा वाढणार आहेत. त्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर पुढील पंधरा दिवस विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे उपसंचालक योगेश पाटील यांनी दिली आहे.

पारंपरिक शिक्षणातून रोजगाराच्या कोणत्याही संधी उपलब्ध होत नसल्यामुळे गेल्या तीन- चार वर्षांपासून विद्यार्थ्यांचा आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे आयटीआय प्रवेशासाठी दरवर्षी 2 लाखांपेक्षा अधिक अर्ज येत आहेत.

वेल्डर, फीटर, टर्नर, वायरमन, इलेक्ट्रीशीयन, कारपेंटर, प्लंबर अशा तब्बल 75 ते 80 विविध अभ्यासक्रमांना दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. यातील ठराविक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची मागणी असते. शासकीय व खासगी आयटीआय प्रवेशासाठी तात्पुरता प्रवेश अर्ज करण्यास सुरूवात झाली आहे. त्याबाबत संचालनालयाच्या संकेतस्थळावरून विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतील. मात्र यंदा काही नवीन खासगी संस्थांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे खासगी आयटीआय सुरू होणार असल्याने, प्रवेश क्षमतेत वाढ झाली आहे. सध्या अडीच हजार जागा वाढल्या असून येत्या आठ दिवसांमध्ये आणखी अडीच हजार जागा वाढणार आहेत.

राज्यात शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये अमरावती 17 हजार 124, औरंगाबाद 18 हजार 82 ,मुंबई 19 हजार 581,नागपूर 26 हजार 354, नाशिक 26 हजार 870 तर पुणे 28 हजार 182 अशा एकूण प्रवेशासाठी 1 लाख 36 हजार 193 जागा उपलब्ध असल्याचे व्यवसाय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. यातील शासकीय 93 हजार 672 तर खासगी 42 हजार 521 जागा असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.