Sat, Mar 23, 2019 18:09होमपेज › Pune › ‘आयटीयन्स’ला ताण नेतोय आत्महत्येकडे...

‘आयटीयन्स’ला ताण नेतोय आत्महत्येकडे...

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 17 2018 12:45AMप्रज्ञा दिवेकर

पिंपळे गुरव :   बदलणारी जीवनशैली, स्पर्धेत टिकून राहण्याची धडपड, असमतोल आहार, व्यायामाचा अभाव यामुळे आजची तरुणाई नैराश्येच्या गर्तेत सापडत आहे. मनासारखे न घडल्याने परिणामी तरूणाई आत्महत्येचा पर्यायही अवलंबत असल्याचे निदर्शनास आले आहे.ताणतणावातून येणार्‍या नैराश्यामुळे आयटीयन्समध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतेच पिंपरी चिंचवडमधील एका अभियंत्याने निराशेतून आत्महत्या  केल्याचे उदाहरण समोर आले आहे. या प्रकरणामुळे आयटीयन्समधील वाढत्या ताणतणावाचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आला आहे. डब्लूएचओच्या सर्वेक्षणानुसार दरवर्षी एक मिलियन नागरिक आत्महत्येचा पर्याय निवडतात. जगामध्ये दर चाळीस सेकंदाला आत्महत्या होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

2010 च्या एनसीआरबीच्या अहवालानुसार 5.9 टक्क्यांनी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. यापैकी भारतातील आठ टक्के नागरिकांना नैराश्याने ग्रासले असल्याचे अहवालातून समोर आले आहे.

यासंदर्भात मानसोपचार तज्ज्ञ जयदीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, दिवसेंदिवस वाढणार्‍या स्पर्धेतून व बदलत्या जीवनशैलीतून नागरिकांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. निराश वाटणे , चिडचिड होणे, भूक कमी लागणे, रडू येणे,नकारात्मक विचार करणे ही सारी नैराश्याची लक्षणे आहेत. सध्या एकत्रित कुटुंब पद्धतीऐवजी विभक्त कुटुंब पद्धती उदयास येत आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये अपुरा संवाद होत असल्याने नैराश्याचे प्रमाण वाढत आहे.

नैराश्यावर मात करण्यासाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते. या समस्येवर मात करण्यासाठी सोशल मीडियाचा जपून वापर करावा, कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे हे ठरवणे गरजेचे आहे. यासंदर्भात आयटी अभियंता निलेश नवले म्हणाला की, नोकरीतील अनिश्चितता, वाढत्या सुख-सोयींच्या अपेक्षा, ऐकमेकांबद्दलची वाढती इर्षा यामुळे व्यक्तींना नैराश्य येते.  परदेशात कंपन्यांमध्ये कर्मचार्‍यांसाठी व्यायामाची सोय असते. त्यांचे वेगवेगळे छंद जोपासण्यावर भर दिला जातो.  भारतामध्ये मात्र कंपन्यांमध्ये नियमबद्ध वातावरणावर भर दिला जातो. 

नैराश्य घालवण्यासाठी वेळेचा सदुपयोग करून सार्वजनिक उपक्रमात भाग घेतला पाहिजे, मन मोकळा संवाद साधला पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हिंजवडीच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरूण वायकर म्हणाले की, हिंजवडी  भागात  2017-2018 या वर्षात आयटी क्षेत्रातील आठ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. असमाधानी वृत्ती, नैराश्य, प्रेम   यांसारख्या कारणांतून या आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे.