होमपेज › Pune › आयटी इंजिनिअरची पत्नीसह आत्महत्या

आयटी इंजिनिअरची पत्नीसह आत्महत्या

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 20 2018 1:11AMपुणे : प्रतिनिधी

आजारी मुलाचा मृत्यू  झाल्याच्या नैराश्यातून आयटी इंजिनिअर पती व पत्नीने आत्महत्या करून आयुष्य संपविल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी मध्यरात्री समोर आला आहे. दरम्यान, मुलाचा ‘व्हिसेरा’ डॉक्टरांनी राखून ठेवला आहे. बाणेर-पाषाण लिंक रोडवरील उच्चभ्रूु सोसायटीत ही घटना घडली. दरम्यान, सतत आजारी असलेल्या पोटच्या मुलाचा मृत्यू झाल्याने आलेल्या  नैराश्यातून दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

जयेशकुमार पटेल (34, रा. बसंतबहार सोसायटी, बाणेर-पाषाण लिंक रोड, चतुःशृंगी), पत्नी भूमिका पटेल (30) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत; तर, नक्ष (4) असे मुलाचे नाव आहे. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पटेल कुटुंबीय मूळचे गुजरातमधील अहमदाबाद शहरातील आहे. जयेशकुमार नोकरीनिमित्त पुण्यात राहण्यास होते. येरवडा परिसरातील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरीस होते. त्यांना महिना दीड लाख रुपये पगार होता; तर भूमिका या गृहिणी होत्या. त्यांना चार वर्षांचा नक्ष हा मुलगा होता. त्यांनी काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी 88 लाख रुपयांना फ्लॅट विकत घेतला होता. 

मात्र, मुलाला लहानपणापासूनच आजार होता. तसेच, त्याला अधून-मधून फिट येत असे. दरम्यान, त्याला मंगळवारी फिट आल्याने तातडीने रुग्णालयात नेले होते. त्या ठिकाणी उपचार करण्यात आल्यानंतर तो बरा झाला होता. बुधवारी तो नेहमीप्रमाणे शाळेतही गेला होता. 

बुधवारी सायंकाळपासून पटेल कुटुंबाचे घर बंद होते. जयेशकुमार पटेल हा कंपनीतही गेला नव्हता. बुधवारी सायंकाळनंतर आणि गुरुवारी दिवसभर घर बंद असल्याने शेजारी राहणार्‍यांना संशय आला; त्यामुळे त्यांनी पावणेअकराच्या सुमारास पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. त्यानंतर चतुःशृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस बाल्कनीतून त्यांच्या दारापर्यंत पोहोचले. त्यांचे दार वाजविले; परंतु त्यांनी दार उघडले नाही. त्यामुळे पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केला. त्या वेळी मुलगा नक्ष व पत्नी भूमिका हे बेडवर आणि जयेशकुमार पटेल हे बेडजवळ मृतावस्थेत आढळले. दरम्यान, जयेशकुमार व पत्नी भूमिका यांच्या गळ्याभोवती दोरीचे व्रण आढळून आले. मुलाच्या तोंडातून फेस आल्याचे समोर आले. ही घटना बुधवारी संध्याकाळी किंवा रात्री घडली असल्याची शक्यता आहे.

शवविच्छेदनात पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र, डॉक्टरांनी मुलगा नक्ष याचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच खरा प्रकार समोर येईल. मात्र, मुलाचा खून झाला नसण्याची दाट शक्यता आहे.  त्याच्या अंगावर कसलेही व्रण किंवा ईजा झालेली नाही. त्याला फिट येत होती. त्यामुळे त्याचा आजारामुळे फिट येऊन मृत्यू झाला असावा. त्यानंतर त्याच्या मृत्यूच्या नैराश्यातून दोघांनी आत्महत्या केली असावी, असे चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दयानंद ढोमे यांनी सांगितले. 

पटेल कुटुंब दिवाळीत बसंत बहार सोसायटीत राहण्यास आले होते. त्यांच्याशी जास्त संपर्क नव्हता. परंतु, त्यांचा मुलगा नक्ष आमच्या चार वर्षीय मुलीसोबत खेळायला येत असे. त्यांच्यात कधी वाद झाल्याचे ऐकले नाही. ते असे काही करतील असे वाटले नव्हते. ही दुर्दैवी घटना पाहून मोठा धक्का बसला आहे. - सुदिप्त रथ, पटेल कुटुंबाचे शेजारी