Sun, Nov 18, 2018 23:56होमपेज › Pune › आयटी अभियंत्याची वाकडमध्ये आत्महत्या

आयटी अभियंत्याची वाकडमध्ये आत्महत्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

वडिलांच्या पिस्तूलमधून गोळी झाडून ‘सीनिअर इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअर’ असणार्‍या मुलाने आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास वाकड येथे उघडकीस आला. पोलिसांना घटनास्थळी चिठ्ठी आढळून आली असून ‘माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये,’ असे त्यात लिहिलेले आहे. आनंद वासुदेव यादव (35, रा. ए-2, 503, रिदम सोसायटी, वाकड) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. 

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आनंद हा वाकड येथे त्याच्या भावासोबत भाड्याच्या घरात एकाटाच राहात होता. तो येरवडा येथील एनव्हीआयडीए या कंपनीत ‘सीनिअर इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअर’ म्हणून काम करत होता. तीन वर्षापूर्वी घरगुती वादातून पत्नीसोबत घटस्फोट झाला असल्याने तो तेव्हापासून नैराश्यात होता. आनंद याचे वडील मुंबई, ठाणे येथे बांधकाम व्यावसायिक असून त्यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल आहे.

आनंद हा रविवारी सुट्टी असल्याने आई-वडिलांकडे ठाणे येथे गेला होता. मध्यरात्री तो ठाण्याहून पुणे, वाकड येथे आला. येताना वडिलांचे नकळत तो पिस्तूल घेऊन आला. नेहमीप्रमाणे तो स्वतःच्या खोलीत झोपायला गेला. सोमवारी सकाळी पावणेनऊ वाजले तरी आनंद खोलीतून बाहेर आला नव्हता. त्यावेळी घरात कामासाठी आलेल्या मोलकरणीने साफसफाई करण्यासाठी दरवाजा वाजवला. बराचवेळ दरवाजा वाजवूनही आतून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. संशय आल्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. तत्काळ वाकड पोलिस घटनास्थळी पोहचले.

पोलिसांनी दरवाजा तोडला असता आनंद हा मृतावस्थेत आढळून आला. मृताच्या शेजारी पिस्तूल पडलेली होती तर डोक्यात गोळीचे छिद्र पडलेले होते. रिकामी पुंगळीही घटनास्थळी आढळून आली. तसेच आनंद याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवली चिठ्ठीही पोलिसांना मिळाली. ‘माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये. मी स्वतःहून आत्महत्या करत आहे,’ असे चिठ्ठीत नमूद केले आहे. घटस्फोटामुळे तो निराश होता, यातूनच त्याने हा प्रकार केला असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. वाकड पोलिस तपास करत आहेत.


  •