Sun, Apr 21, 2019 01:56होमपेज › Pune › अजंठानगर येथील महापालिकेच्या शाळेला आयएसओ मानांकन

अजंठानगर येथील महापालिकेच्या शाळेला आयएसओ मानांकन

Published On: Jun 17 2018 1:37AM | Last Updated: Jun 17 2018 1:12AMपिंपरी ः प्रतिनिधी

महापालिकेची शाळा म्हटली दुय्यम दर्जाचे शिक्षण मिळते असा समज आहे. परंतू अजंठानगर येथील महापालिकेच्या शाळेने हा समज खोटा ठरवत हम भी किसीसे कम नही हे दाखवून देत आयएसओ मानांकन प्राप्त केेले आहे. राज्यशासनाचे सर्व निकषांची पूर्तता करुन अजंठानगर येथील माता रमाबाई भिमराव आंबेडकर प्राथमिक शाळा आयएसओ मानांकन प्राप्त करणारी शहरातील दुसरी पालिकेची शाळा ठरली आहे.

मानांकनासाठी राज्य शासनाने घालून दिलेल्या 24 निकषांची पुर्तता केल्याने अजंठानगर येथील  शाळेला आयएसओ’ मानांकन मिळाले आहे. शहरात पालिकेच्या 106 शाळा असून  दिवसेंदिवस काही शाळांमधील पटसंख्या घटत आहे. झोपडपट्टी परीसरातील शाळांमध्ये  पटसंख्या सर्वाधिक आहे. हल्ली इंग्रजी माध्यमांकडे मुलांचा ओढा असल्याने महापालिकेच्या शाळांपूढे इंग्रजी शाळांनी मोठे आव्हान उभे केले आहे. परंतू हे आव्हान स्विकारुन पालिकेच्या शाळेत देखील गुणात्मक दर्जा राखला जातो. तसेच विद्यार्थ्याना सर्व सोयी पुरवल्या जातात हेच या शाळेने सिध्द केले आहे. 

निगडीच्या अजंठानगर येथील माता रमाबाई आंबेडकर कन्या शाळा आणि माता रमाबाई आंबेडकर मुलांची शाळा या दोन्ही शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग घेतले जातात.  या शाळेमध्ये 400 मुली व 400 मुले अशी एकूण 800 विद्यार्थी संख्या आहे.  कन्या शाळेत  10 शिक्षक आहेत. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी योगा वर्गही चालवण्यात येतात. आयएसओ’ मानांकनासाठी निर्धारीत केलेलेे 24 निकषावर खरे उतरत या शाळेने गुणवत्ता  सिध्द केली आहे.

शाळेच्या बोलक्या भिंती गांडुळखतासह विविध उपक्रम , तसेच विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा, गुणवत्ता वाढवणारे प्रकल्प व उपक्रम, सौरउर्जा प्रकल्प, विद्यार्थ्यांची उपस्थिती, डीजीटल क्लासरुम, सुसज्ज प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेसह त्यांच्या आरोग्याचीही काळजी तसेच मागील तीन वर्षातील शाळेचे रेकॉर्ड हे सर्व निकष शाळेने पुर्ण केले. शाळेमध्ये ई-लर्निंग, वाचन संस्कार प्रकल्प,  रेन वॉटर हार्वेस्टिंग, गांडुळ खत प्रकल्प, पर्यावरणपुरक कुंडी प्रकल्प व औषधी वनस्पतींचे टेरेस गार्डन असे उपक्रम राबवून गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न शाळेमार्फत होत आहे. त्यामुळे मानांकन मिळवून हम भी किसीसे कम नही हेच दाखवून दिले आहे.