Fri, Jul 19, 2019 13:25होमपेज › Pune › आयपीएलवर सट्टा घेणारे पाच अटकेत

आयपीएलवर सट्टा घेणारे पाच अटकेत

Published On: May 04 2018 2:00AM | Last Updated: May 04 2018 1:59AMपुणे : प्रतिनिधी 

आयपीएल मॅचेसवर सट्टा घेणार्‍या पाच सट्टेबाजांना खालापूर येथील हॉटेल लिला इन येथे पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि रायगड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण 12 लाख 26 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

विक्रम वारसमल जैन (वय 39, रा़ निगडी गावठाण), नरेश रामस्वरुप अगरवाल (वय 47, रा़  सोमाटणे फाटा), नवीन रामस्वरुप अगरवाल (वय 41, रा़ मेन बाजार, देहुरोड), दीपक दौलतराम कृपलानी (वय 43, रा़ जाधववाडी, चिखली), नदीम मैमुद्दीन पठाण (वय 28, रा़ आकुर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या मॅचवर बेटिंग घेण्यासाठी काही जण सोमाटणे फाटा येथून एका पांढर्‍या रंगाच्या स्कोडा कारमधून निघणार असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला बुधवारी मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक व त्यांच्या पथकाने सोमाटणे फाटा येथे त्यांच्यावर पाळत ठेवली़  त्यावेळी थोड्या वेळातच तेथे मिळालेल्या माहितीप्रमाणे एक कार देहुरोडकडून तळेगाव दाभाडेकडे गेली. त्यानंतर पथकाने या कारचा पाठलाग केला़  त्यावेळी ती कार खालापूरमार्गे पनवेल रोडवरील हॉटेल लिला इन या हॉटेलसमोर थांबली़  त्या कारमधील लोक साहित्यासह हॉटेलमध्ये गेले़ त्यावेळी पुणे ग्रामीणच्या पथकाने तातडीने रायगड जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून त्यांच्या पथकाला बोलावून घेतले़  

त्यानंतर पोलिसांनी तेथे संयुक्तरित्या छापा टाकला. तेव्हा तेथील एका रुममध्ये आयपीएलचे चालू असलेल्या क्रिकेट मॅचवर बेटिंग करताना मिळून आले़  तेथे असलेल्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेत 11 मोबाईल, 1 लॅपटॉप, कॅल्क्युलेटर, 1 पोर्टेबल टी व्ही, सेट टॉप बॉक्ससह रोख 98 हजार 460 रुपये आणि कार असा 12 लाख 26 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़  याप्रकरणी रायगड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अमोल वळसंग यांनी पाच आरोपी व लॉज मॅनेजर अशा 6 जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे़

पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक निळकंठ जगताप, गणेश क्षीरसागर, सहायक फौजदार सुनिल बांदल, हवालदार दत्तात्रय जगताप, शरद बांबळे, नितीन भोर, महेश गायकवाड, तसेच रायगड जिल्हा पोलिस दलाचे स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुहास आव्हाड, अमोल वळसंग व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली़