होमपेज › Pune › धर्मादाय रुग्णालयांत आयपीएफ फंडचा खडखडाट

धर्मादाय रुग्णालयांत आयपीएफ फंडचा खडखडाट

Published On: Dec 25 2017 1:19AM | Last Updated: Dec 25 2017 12:35AM

बुकमार्क करा

पुणे : ज्ञानेश्‍वर भोंडे

शहरातील तीन धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्याकडे गरीब रुग्णांवर खर्च करण्यासाठी असलेली राखीव रक्‍कम (आयपीएफ फंड) संपली आहे. त्यामुळे या योजनेला तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी मागणी सहधर्मादाय आयुक्‍तांकडे केली आहे. कोरेगाव पार्क येथील इनलॅक्स बुधरानी रुग्णालयाने सर्वाधिक 11 कोटी रुपयांची स्वतःकडील रक्‍कम गरीब रुग्णांवर खर्च केली आहे. 

पुण्यात रुबी हॉल, जहांगीर, इनलॅक्स बुधरानी, पूना, संचेती, सह्याद्री (डेक्‍कन), दीनानाथ मंगेशकर यांसह 59 रुग्णालये ही धर्मादाय आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विश्‍वस्त संस्था कायदा 1950 मधील तरतुदीनुसार धर्मादाय रुग्णालयांंनी त्यांना एकूण प्राप्त होणार्‍या उत्पन्नापैकी दोन टक्के उत्पन्न गरीब रुग्णांवर खर्च करणे बंधनकारक आहे.  ही रक्‍कम ‘गरीब रुग्ण निधी’ (आयपीएफ फंड) म्हणून ओळखली जाते. त्याचे प्रत्येक रुग्णालयाकडे स्वतंत्र खाते असून, प्रत्येक महिन्याला दोन टक्के रक्‍कम जमा केली जाते. त्यासाठी त्यांनी निर्धन रुग्णांसाठी 10 टक्के तर आर्थिक दुर्बल घटकांसाठी 10 टक्के अशा एकूण 20 टक्के खाटा राखीव ठेवणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे शहरातील रुग्णालये खर्चदेखील करत आहेत. 

धर्मादाय आयुक्‍त शिवकुमार डिगे यांनी गरीब रुग्णांना या धर्मादाय रुग्णालयांतून सवलतीत अथवा मोफत उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयाचपर सक्‍ती केली आहे. त्यामुळे रुग्णालये गरीब रुग्णांवर पैसे खर्च करत आहेत. मात्र, त्यांच्याकडे असलेला आयपीएफ फंड प्रत्येक महिन्याकाठी अपुरा पडत आहे. मात्र, फंड संपला तरीही गरीब रुग्णांवर उपचार करा आणि त्याची रक्‍कम पुढील महिन्यात मिळणार्‍या फंडातून वजा करा, पण गरिबांवर उपचार थांबवू नका, असे आवाहन धर्मादाय आयुक्‍तांनी रुग्णालयांना केलेले आहे.

त्याला रुग्णालयेदेखील प्रतिसाद देत असून, आयपीएफ फंड संपून स्वतःची काही लाख, कोटी रुपयांची रक्‍कम खर्च केली आहे; पण हा तोटा वाढत चालल्याामुळे या योजनेला काही काळ स्थगिती द्यावी, अशी विनंती शहरातील पूना हॉस्पिटल, इनलॅक्स बुधरानी आणि केईएम रुग्णालयांनी धर्मादाय कार्यालयाकडे केली आहे. अर्ज आल्यानंतर धर्मादाय कार्यालयाच्या निरीक्षकांकडून संबंधित रुग्णालयांनी निधी पात्र रुग्णांवर आणि योग्य बील आकारले आहे का, याची छाननी केली जाते.  

फंड संपल्यास अर्ज करा

धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्याकडील आयपीएफ  फंड संपला असल्यास धर्मादाय कार्यालयाकडे तसा अर्ज करावा. त्याची चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. सध्या केईम, इनलॅक्स बुधरानी व पूना हॉस्पिटलकडून असे अर्ज आले आहेत. यापैकी इनलॅक्सची चौकशी झाली असून, त्यांनी 11 कोटी रुपयांचा खर्च आयपीएफ व्यतिरिक्‍त रुग्णांवर केला आहे; तर एका रुग्णालयाने अर्ज न करता ते परस्पर कोर्टात गेल्याने त्याची चौकशी सुरू केली आहे.  - नवनाथ जगताप, सहायक धर्मादाय आयुक्‍त, रुग्णालय विभाग

11 कोटी पदरचा खर्च

आयपीएफ फंडातील खात्यातून 11 कोटी रुपये तोट्यात असतानादेखील गरीब रुग्णांच्या उपचारांसाठी रुग्णालयाकडून खर्च केला जात आहे. सध्या हृदयरोग विभाग आणि इतर उपचारांवर सूट देण्यात येत आहे. गरीब रुग्णांची सेवा हे रुग्णालयाचे ब्रीद आहे.  - डॉ. रिया पंजाबी, वैद्यकीय संचालक, इनलॅक्स व बुधरानी रुग्णालय कोरेगाव पार्क