Sat, Jul 20, 2019 23:43होमपेज › Pune › आयटी तरूणाईकडून पक्षांना चारापाणी

आयटी तरूणाईकडून पक्षांना चारापाणी

Published On: Apr 15 2018 1:35PM | Last Updated: Apr 15 2018 1:35PMपुणे : नरेंद्र साठे

दिवसेंदिवस वाढत असलेली उन्हाची तिव्रता, नैसर्गिक पाणवठ्यावरील पाणी संपल्याने पक्षांचे या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात हाल होतात. यासाठी हिंजवडीतील आयटीयन्स मंडळी सरसावली आहे. या आयटीयन्स मंडळींनी व्हॉटस्‌ऍपच्या ग्रुपद्वारे् एकत्र येऊन पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हेल्दी रोमिंग या नावाखाली आयटीयन्स समूहाने पक्ष्यांना खाद्य ठेवणे, पाणी ठेवणे असा उपक्रम सुरू केला आहे.

पहिल्या टप्प्यात वेताळ टेकडीवर हा उपक्रम राबवला असून याद्वारे शेकडो पक्ष्यांची तहान भागवली जात आहे. पुण्यात हे काम सुरूच ठेवणार असून आमच्या ग्रुपमध्ये अनेक जण कोल्हापूरचे आहेत. त्यामुळे एक दिवशी आम्ही सगळे मिळून कोल्हापूर जवळ ठिकाण ठरवून हाच उपक्रम राबवणार असल्याचे अक्षय मोर्चे याने माहिती दिली.

आयटीयन्स तरूणाई सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येऊन पर्यावरण रक्षणासाठी काम करत आहेत. हिंजवडी ते कोल्हापूर या व्हॉटस्‌ऍप पॅटर्नमुळे कोल्हापूरसाठी एसटी बस सुरू करण्यात आली त्यानंतर या पॅटर्नमुळे राज्यभरात अनेक ठिकाणी एसटी बस थेट हिंजवडीतूनच सुरू झाल्या आहेत. या बसचे नियोजन करण्यात येणार्‍या ग्रुपवर आता पर्यावरणासाठी पुढाकार घेण्यासाठी काही मंडळी एकत्र येऊन हेल्दी रोमिंग नावाचा वेगळा ग्रुप तयार करून त्याद्वारे पर्यावरण रक्षणासाठी विविध कामे केली जात आहेत. गतवर्षी या तरूणांनी शहराजवळी एका खेडेगावामध्ये जाऊन श्रमदान केले होते. आयटी क्षेत्रात काम करून जगाशी संपर्कात असणार्‍या या मंडळींनी स्वतःहून पुढाकार घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. त्यांच्या कंपन्यांमधून देखील या तरूणांईचे कौतूक होत आहे.

आयटीमध्ये शनिवार, रविवारी दोन दिवस सुट्टी असल्याने एक दिवस सकाळी जवळच्या टेकडीवर जाऊन ही मंडळी पर्यावरणाच्या संदर्भातील कामे करतात. वेताळ टेकडीवर गत रविवारपासून उपक्रम हाती घेतला असून पुन्हा रविवारी (दि.१५) देखील या तरूणाईकडून पक्षांना खाद्य ठेवणे आणि पाणी ठेवण्याचे काम केले जाणार आहे. या तरूणांनी रिकाम्या टाकाऊ पाण्याच्या बाटल्या जमा केल्या त्या कापून, त्यांना दोर्‍या बांधून त्याध्ये पाणी आणि चारा ठेवून वेताळ टेकडीवरील झाडांना लटकवल्या आहेत. पर्यावरण पुरक कामे करण्यासाठी अभिजीत सांवत, अनिकेत करडे आणि अक्षय मोर्चे यांनी पुढाकर घेऊन सर्वांना एकत्र आणले.

Tags : IIT, Student, Developed, Water, Birds, Pune