पुणे : प्रतिनिधी
कौन्सिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनतर्फे (आयसीएसई) मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (१४ मे)जाहीर करण्यात आला. बोर्डाचा दहावीचा निकाल ९८.५१ टक्के, तर बारावीचा निकाल ९६.२१ टक्के एवढा लागला आहे. दहावीच्या परीक्षेत मुंबईच्या स्वयम दास या विद्यार्थ्यांने ९९.४ टक्के गुण घेऊन देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.
आयसीएसई द्वारे घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या परिक्षांचा निकाल आज दुपारी ३ वाजता जाहीर करण्यात आला. हा निकाल बोर्डाच्या वेबसाइटवर पाहता येणार आहे. गेल्या वर्षी दहावीचा निकाल ९८.५३ टक्के, तर बारावीचा निकाल ९६.४७ टक्के लागला होता. यावेळी बोर्डाचा दहावीचा निकाल ९८.५१ टक्के , तर बारावीचा निकाल ९६.२१ टक्के लागला आहे.
आयसीएसई द्वारे घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या परिक्षांचा निकाल विद्यार्थी एसएमएस करूनही मिळवू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना ICSE किंवा ICS टाइप करून त्यापुढे त्यांचा सात अंकी युनिक आयडी कोड टाकून ०९२४८०८२८८३ या क्रमांकावर पाठवावा लागणार आहे.