Thu, Aug 22, 2019 03:51होमपेज › Pune › सह. पोलिस आयुक्तांना न्यायालयात खेचणार : अँड. प्रकाश आंबेडकर

सह. पोलिस आयुक्तांना न्यायालयात खेचणार : अँड. प्रकाश आंबेडकर

Published On: Jun 20 2018 8:58PM | Last Updated: Jun 20 2018 8:58PMपुणे : प्रतिनिधी

मी नक्षलवाद्यांना मदत करत असल्याचा पुरावा मिळाल्याचे पुणे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. पोलिसांचा हा आरोप खोटा असून पुणे पोलिसांना मी आत्ता वकीली दणका देणार आहे. पत्रकार परिषदेत माझ्यावर आरोप करणारे पुणे पोलिसांचे सह आयुक्त रविंद्र कदम यांना मी लवकरच नोटीस पाठवून न्यायालयात खेचणार आहे, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. दरम्यान देशात भाजप सरकार विरोधी वारे वाहु लागल्याने पत्रकार गौरी लंकेश यांच्या एका मारेकर्‍याला अटक करण्यात आली आहे. मास्टरमाईंडला मात्र मोकाट सोडण्यात आले असल्याचा आरोप अँड. आंबेडकर यांनी केला.  

शनिवार वाड्यावर ३१ डिसेंबर रोजी झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजकांवर पोलिसांनी सत्ताधार्‍यांच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी काहीना अटकही करण्यात आली आहे. अटक केलेल्यांकडून जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये मी नक्षलवाद्यांना मदत करत असल्याचा पुरावा मिळाल्याचे पुणे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. तपासादरम्यान कोणतेही कागदपत्रे मिळाल्यानंतर त्यासंबंधी काही नियम पाळणे बंधनकारक असते. त्या कागदपत्राची तपासणी विविध विभागांमार्फत करून तो कोणत्या प्रिंटरमध्ये प्रिंट झाला, त्याच्या आणि टाईप केलेल्या कॉम्युटरचा आयपी ऍड्रेस यासंबंधी तपास करून अहवाल मागविले जातात. पोलिसांनी दाखविलेल्या कागदपत्रांसंबंधी या प्रक्रीया केल्याचे कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे ही कागदपत्रे बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एल्गार परिषदेच्या आयोजनात माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत आणि कोळसे पाटील होते. मात्र हे दोघेही माजी न्यायमूर्ती असल्यामुळे पोलीस त्यांच्यावर कारवाई करु शकत नाहीत. मी आपला सामान्य माणूस असल्यामुळे पोलिसांनी माझ्यावर आरोप केले. पोलिसांनी दाखविलेली कागदपत्रे बनावट असल्याचे नक्षलवादावर काम करणार्‍या पोलिस आधिकार्‍यांचे मत असल्याचेही अँड. आंबेडकर यांनी सांगितले. 

पोलिसांनी माझ्यावर आरोप केला आहे, ते मला चौकशीला बोलावण्याची वाट न पाहता मी त्यांना वकीली दणका देऊन नोटीस पाठविणार आहे. जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांनाही पोलिस चौकशीला बोलावू शकत नाहीत. चौकशीला बोलावले तर लगेच पोलिसांवर  अब्रुनुकसानीचा दावा दाखल होऊ शकतो. भिमा कोरेगाव दंगलीस कारणीभूत असलेल्या संभाजी भिडे यांना वाचविण्यासाठी पोलिसांनी हे कारस्थान केले आहे. त्यांचा हा डाव त्यांच्यावर उलटणार आहे. भाजप आणि कॉंग्रेस पक्ष सोडून राज्य स्तरावरील इतर लहान लहान राजकीय पक्षांना मी एकत्र करू शकतो, आणि या दोन्ही पक्षांना सक्षम पर्याय देऊ शकतो, हे सत्ताधार्‍यांनी ओळखल्याने ते माझ्यावर खोटे आरोप लादून मला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.

मारेकरी सत्ताधारी पक्षाच्या जवळचे

स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पोलिसांनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकर्‍यांपैकी एकाला अटक केली आहे. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे मारणारे कोण आहेत, हे पोलिसांना आणि सत्ताधार्‍यांना चांगले माहित आहेत. यामागे कोण आहेत, गोळी कोणी चालवली याची माहिती पोलिसांना आहे. चौघांचेही मारेकरी सत्ताधार्‍याशी संबंधीत आणि जवळचे असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, हे कळून चुकल्याने पोलिसांनी लंकेश यांच्या एका मारेकर्‍याला अटक केली आहे, असा आरोपही आंबेडकरांनी केला आहे.