Sat, Jun 06, 2020 06:30होमपेज › Pune › प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 03 2018 1:22AMपुणे / धायरी : प्रतिनिधी

प्रियकाराच्या आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पतीचा खून करून, मृतदेह कॉनॉलमध्ये टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा सगळा प्रकार केल्यानंतर पत्नीनेच पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दिली. त्या इसमाचा मृतदेह कॉनॉलमध्ये आढळल्यानंतर पोलिसांनी या खूनाचा छडा लावला. याप्रकरणी हवेली पोलिसांनी महिलेसह तिचा प्रियकर व त्याच्या मित्राला अटक केली आहे. प्रेमसंबंधाची माहिती पतीला मिळाल्याने तो शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याने तिने हे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. 

अनिरूद्ध तिमाजी गोंधळे (वय 42, रा. गिरीनगर, खडकवासला) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी सुषमा गोंधळे (वय 32) आणि तिचा प्रियकर मयुर उर्फ पप्पू श्रीपती काकडे (वय 26, रा. खडकवासला), दत्ता सुरेश कांबळे (वय 21) अशा तिघांविरुद्ध हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयुर उर्फ पप्पू काकडे याचे सुषमासोबत प्रेमसंबंध होते. त्याची माहिती अनिरूद्ध गोंधळे याला समजली. त्यामुळे तो पत्नी सुषमा हिला मारहाण व शिवीगाळ करत होता. त्यामुळे आरोपींनी अनिरूद्ध याचा खून करण्याचा कट रचला. त्यानुसार, त्याला सोमवारी (दि. 30) खडकवासला येथील सी. डब्यु पीआरएस जॉकवेल कॉनॉल शेजारी गोड बोलून नेले. त्याठिकाणी गेल्यानंतर मयुर काकडे, त्याचा मित्र दत्ता कांबळे आणि पत्नीने त्याच्या डोक्यात दागड व बांबूने मारहाण करून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कॉनॉलमध्ये टाकला.

हा प्रकार केल्यानंतर पत्नी सुषमा हिनेच पोलिसांकडे पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, दुसर्‍या दिवशी वडगाव बुद्रुक अग्निशामक दलाने बेवारस मृतदेह काढला. पोलिस तपास करत असताना त्यांना मृतदेह कॉनॉलमध्ये मिळाल्याची माहिती मिळाली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तपास सुरु केला. त्यावेळी हा मृतदेह अनिरूद्ध याचा असल्याचे उघडकीस आले. 
त्याचा खून झाल्याचा संशय आल्याने पोलिसांनी अनिरुद्धची पत्नी, प्रियकर आणि त्याच्या मित्राला अटक केली. अधिक तपास हवेली पोलिस करत आहेत.

Tags : Pune, Husbands, blood, help, lover