Sun, Aug 25, 2019 00:25होमपेज › Pune › पत्नीचा खून करून पती पोलिस ठाण्यात हजर

पत्नीचा खून करून पती पोलिस ठाण्यात हजर

Published On: Feb 19 2018 1:37AM | Last Updated: Feb 19 2018 1:10AMपुणे : प्रतिनिधी

मुंबईवरून पत्नीला भेटण्यास आलेल्या पतीने पत्नीचा गळा दाबून खून करून स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. अनैतिक संबंधातून त्याने पत्नीचा खून केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. एका हॉटेलमध्ये रविवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दीपा असावरे-सिंग (रा. पिंपरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी, तिचा पती मलय कुमार सिंग (रा. मुंबई, मूळ रा. बिहार) याला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपा आणि मलय सिंग या दोघांची 10 वर्षांपासून ओळख आहे. दोन वर्षापूर्वी त्यांनी लग्न केले. त्यानंतर ते दोघेही पुण्यात रहात होते. मलय सिंग हा कामाच्या शोधात मुंबईला गेला, तेथे त्याने एम्ब्रॉयडरीचे काम करण्यास सुरूवात केली. 

दीपा ही पुण्यात आई-वडिलांसोबत रहात होती. दरम्यान, तिचे एकासोबत अनैतिक संबंध जडले. हा प्रकार मलय सिंगला कळाल्यानंतर त्याने तिला अनेकदा समजावून सांगितले. तरीही तिच्यात फरक पडला नाही. ती प्रियकरोसोबतचे फोटोही सोशल मीडियावर टाकत असे. समजावून सांगूनही दीपामध्ये फरक पडत नसल्याने त्यांच्यात वाद होत होता. 

दरम्यान, मलयसिंग हा मुंबईवरून पुण्यात आला. यावेळी त्याने पत्नीला पुणे स्टेशन परिसरात बोलावून घेतले. दुपारी ते दोघे समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुयश हॉटेलमध्ये गेले. तेथे त्याने तिला दोन-तीन तास समजावून सांगितले. यावरून दोघांमध्ये प्रचंड वादावादी सुरू झाली. त्यामुळे संतापलेल्या सिंगने ट्रॅकपॅन्टच्या नाड्याने तिचा गळा आवळून खून केला. यानंतर सिंग बंडगार्डन पोलिस ठाण्यात जाऊन तेथील पोलिसांना हा घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. 

परंतु, सुयश हॉटेल समर्थ पोलिसांच्या हद्दीतील असल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेऊन समर्थ पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत त्याविरोधात समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.