Wed, Jan 16, 2019 12:13होमपेज › Pune › पत्नी-आईच्या वादात पतीराजांची पंचाईत!

पत्नी-आईच्या वादात पतीराजांची पंचाईत!

Published On: Aug 06 2018 1:54AM | Last Updated: Aug 06 2018 12:50AMपुणे :  अक्षय फाटक 

एकीकडे तुझी बायको लवकर उठत नाही अन् कामही करत नाही...तिला धड स्वयंपाकही येत नाही... तर दुसरीकडे  तुमची आई मला सतत टोमणे मारतात... नीट बोलत नाही... सतत शेजार्‍यांच्या सुनांशी तुलना करून कुरकुर करतात...अशा पत्नी आणि आईच्या दररोजच्या तक्रारी ऐकून कर्त्या पुरुषाचे डोके गरगरायला लागते. याप्रकरणात नेमकी कुणाची बाजू घ्यावी? या प्रश्‍नांचे उत्तर त्याला आयुष्यभर मिळत नाही! जन्मदात्रीचे ऐकावे तर पत्नी चिडचिड करते आणि पत्नीच्या बाजूने बोलावे तर आई नाराज होते. ऑफिस किंवा स्वत:चा व्यवसाय सांभाळतानाच घरच्या पेल्यातील हे नेहमीचे वादळ शांत करताना शहरातील पतीराजांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरातील अनेक घरात वरील चित्र पाहायला मिळत आहे. दुसर्‍या कटुंबातील मुलगी आपल्या घरात सुन म्हणून आल्यानंतर लागलीच तिच्याकडून भरमसाठ अपेक्षा ठेवल्या जातात. यातून पती-पत्नीच्या किरकोळ वादांचे रुपांतर घटस्फोटापर्यंत जाऊ लागले आहेत. घरगुती वाद विकोपाला गेल्यानंतर पोलिस ठाण्यांपयर्र्ंत याबद्दलच्या तक्रारी येत आहेत. पोलिस आयुक्तालयात यासाठी महिला सहाय्यक कक्ष सुरू करण्यात आला आहे. याठिकाणी आलेले दांम्पत्य आणि कुटुंबातील सदस्यांचे समूपदेशन केले जाते. गेल्या सहा महिन्यांमध्ये 1 हजार 758 तक्रारी या महिला साह्य कक्षात आलेल्या आहेत.  त्यातील निम्म्या तक्रारी निकाली काढल्या. पत्नीच्या विरोधातील 60 टक्के तर पतीच्या विरोधातील 40 टक्के तक्रारींचा समावेश होता. संसार तुटण्याच्या मार्गावर असलेल्या 383 दांम्पत्यांना समूपदेशनद्वारे पुन्हा एकत्र आणले. 

आई-वडिलांचे संसारात डोकावणे वाढतेय

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे एकमेकांचे लक्ष असायचे आणि नवविवाहितेला सुरुवातीच्या काळात  सांभाळूनही घेतले जात असत. लग्न होऊन मुलगी सासरी गेल्यानंतर तिचे आई-वडिल तिच्या संसारात लक्ष घालत नसत. काही वादाचा प्रसंग ओढावलाच तर मुलीलाच समजावून सांगत. मात्र, सध्या मुलींच्या आई-वडिलांचे संसारात डोकावणे वाढत आहे.