Fri, Feb 22, 2019 17:42होमपेज › Pune › दीडशे अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्या

दीडशे अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्या

Published On: May 11 2018 1:12AM | Last Updated: May 11 2018 1:07AMपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत  एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या सुमारे दीडशे अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सुमारे 24 दिवसांच्या सुटीवर जाण्यापूर्वी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या बदल्याच्या आदेशावर सह्या केल्या आहेत. त्यामुळे बदली रोखण्यासाठी विविध मार्गाने आयुक्तांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करता येणार नाही. परिणामी, बदलीच्या ठिकाणी त्यांना निमुठपणे रूजू व्हावे लागणार आहे.  

महापालिकेने अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्याबाबत धोरण निश्‍चित केले आहे.  त्यानुसार दरवर्षी एप्रिल व  मे महिन्यात तीन वर्षात टेबल आणि सहा वर्षात विभागाअंतर्गंत बदली करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यांची अंमलबजावणी होत असल्याची तक्रार आहे. अधिक कमाईचे आणि कमी काम असलेल्या विभागात असंख्य अधिकारी व कर्मचारी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसले आहेत. त्यासंदर्भात अनेक तक्रारी होऊनही प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.  राजकीय पदाधिकारी आणि नगरसेवकांचा दबावामुळे प्रशासन या बदल्यांच्या धोरणाबाबत गंभीर नाही. 

त्यामुळे यंदा या धोरणावर ठोस निर्णय घेण्याचा इरादा आयुक्त हर्डीकर यांनी पूर्वीच बोलून दाखविला होता. ते शुक्रवार (दि.11) ते 2 जूनपर्यंत सुटीवर आहेत. सुटीवर जाण्यापूर्वी त्यांनी या बदल्याच्या आदेशावर गुरूवारी (दि.10) सह्या केल्या आहेत. बदली झालेल्यांमध्ये स्थापत्य, बांधकाम परवाना, नगर रचना, पाणीपुरवठा, ड्रेनेज अशा ‘अधिक मागणी’ असलेल्या विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकारी, कर्मचारी व अभियंत्यांचाही समावेश आहे.