Tue, May 21, 2019 22:54होमपेज › Pune › ‘ह्युमॅन’ देणार बेघरांना मॅजिक कव्हर!

‘ह्युमॅन’ देणार बेघरांना मॅजिक कव्हर!

Published On: Aug 08 2018 1:50AM | Last Updated: Aug 07 2018 11:27PMपिंपरी : वर्षा कांबळे

थंडीचे दिवस आले की, आपण पाहतो बर्‍याच सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती फूटपाथवर राहणार्‍या, बेघर व्यक्तींना उबदार कपडे आणि ब्लँकेटचे वाटप करताना दिसतात. मात्र, पावसाळा आला की या उबदार कपड्यांना सांभाळायचे कसे हा यक्षप्रश्‍न या व्यक्तींसमोर उभा असतो. यासाठी फ्लेक्सचे मटेरियल व ब्लँकेट किंवा जुने कपडे यांचे एक वॉटरप्रूफ ब्लँकेट तयार करण्याची कल्पना ‘ह्युमॅन इंडिया का अपना सुपरहिरो’ टीममधील तरुणांना सुचली. या वॉटरप्रूफ ब्लँकेटला त्यांनी ‘मॅजिक कव्हर’ असे नाव दिले आहे. सध्या ही मंडळी या कामात व्यस्त आहेत.

शहरामध्ये ठिकठिकाणी, चौकाचौकात बेघर व्यक्ती आणि कुटुंबे फूटपाथवर थंडी व पावसात जीवन व्यतीत करत असतात. बर्‍याच व्यक्तींकडे थंडी आणि पावसापासून बचाव करण्याचे साधन नसते. त्यामुळे त्यांची लहान मुले, ज्येष्ठ नेहमी आजारी पडतात. पावसाळ्यात अती पावसामुळे निवारा नसल्याने ही उबदार कपडे भिजतात. अशा व्यक्तींसाठी मदत म्हणून ‘मॅजिक कव्हर’ तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी वाढदिवसांचे, जाहिरातींचे मोठे-मोठे फ्लेक्सचा वापर केला आहे. निरुपयोगी असलेले हे फ्लेक्स गोळा करुन त्याची पांढरी बाजू वरती आणि आतमध्ये ब्लँकेट असे शिवून त्याला चैन बसविण्यात येणार आहे. अशाप्रकारचे हे वॉटरप्रूफ ब्लँकेट हिवाळा आणि पावसाळ्यातही वापरता येणार आहे.

या टीममध्ये 40 ते 50 विद्यार्थी आहेत. जे पुणे आणि पिंपरी -चिंचवड याठिकाणी वास्तव्यास आहेत. मॅजिक कव्हरसाठी सर्व सदस्य जुने कपडे, चादर, बेडशीटस गोळा करण्याचे काम करत आहेत. गोळा केल्या कपड्यातून चांगले आणि फाटके कपडे वेगळे केले जाणार आहेत. जुन्या व फाटक्या कपड्यांपासून गोधडी तयार केली जाणार आहे.  टीममधील सदस्यांनी फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांना वापरात नसणारे, जुने कपडे देण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार ज्या परिसरातून मेसेज येतील तिथले सदस्य नागरिकांच्या घरी जाऊन कपडे गोळा करतात.