Tue, Jun 18, 2019 23:25होमपेज › Pune › नसबंदी केलेल्या कुत्र्यांना पिल्ले कशी?

नसबंदी केलेल्या कुत्र्यांना पिल्ले कशी?

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 22 2018 12:56AMपुणे : प्रतिनिधी

ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले यांच्यावर काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता, या घटनेचे पडसाद पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी उमटले. शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांंचे लसीकरण, नसबंदी आणि शस्त्रक्रिया केली जाते. असे प्रशासनाचे म्हणणे असेल तर कान कापलेल्या आणि नसबंदी केलेल्या आमच्या भागातील कुत्र्यांना पिल्ले कशी झाली. असा प्रश्‍न उपस्थित करत नगरसेविका कालिंदी पुंडे यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, सर्वच नगसेवकांनी भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर असून, पालिका प्रशासन प्रतिबंधात्मक कारवाई करत नसल्याचा 
आरोप केला.

मंगला गोडबोले यांनी वेळेवर रेबीज इंजेक्शन सुध्दा मिळाले नसल्याचे नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. प्रत्येक रुग्णालयामध्ये रेबीजची लस ठेवणे बंधनकारक केले पाहिजे, असे एकबोटे यांनी सांगितले. माधुरी सहस्त्रबुध्दे म्हणाल्या, पर्यावरण सभेत आणि सर्वसाधारण सभेमध्ये अनेकवेळा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न विचारण्यात आला. प्रशासनाकडून खोटी आकडेवारी देण्यात येते. अनेक वेळा पालिका प्रशासन कारवाईला गेल्यानंतर प्राणिमित्र कारवाई करू देत नाहीत. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन कारवाई झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले.नंदा लोणकर म्हणाल्या, उपनगरांमध्ये कुत्र्यांचा आणि डुकरांचा सुळसुळाट आहे. कोट्यवधी रुपये खर्च होतात; मात्र कारवाई काहीच दिसत नाही.

याविषयी प्रभारी आरोग्य प्रमुख संजीव वावरे म्हणाले, महापालिका प्रशासनाकडून शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी, शस्त्रक्रिया, लसीकरण केले जाते. यासाठी सन 2016-17 साठी 60 लाख, 2017-18 साठी 72 लाख रुपयांची तरतूद होती, तर यंदाच्या वर्षासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध असून, 35 हजार कुत्र्यांची नसबंदी करण्यात येईल. यावर सभागृहातील नगरसेवकांनी वर्षाला लाखो रुपये भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी खर्च केले जातात, मग कुत्र्यांची संख्या दरवर्षी वाढते कशी, असा प्रश्‍न उपस्थित केला. मंत्रालयामध्ये उंदीर मारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. त्याप्रमाणे पालिकेतील कुत्र्यांचा प्रकार झाला की काय, असा प्रश्‍नही उपस्थित केला. 

प्शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक झाले रुग्ण 

रस्त्यावर साचलेल्या चिखलावरून दुचाकीस्वार घसरून पडत असताना अग्निशामक विभागाचे अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर ऑईल सांडले तरच आम्ही रस्ता धुवू शकतो, चिखलाचे रस्ते धुणेे आमच्या नियमात बसत नाहीत, असे म्हणून काम टाळतात. या घटनेकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे रुग्ण होऊन पालिका सभागृहात अवतरले. लोकांच्या जिवाची किंमत नसलेल्या अग्निशामक अधिकार्‍यांना त्वरित निलंबित करा, अशी मागणी यावेळी ससाणे यांनी केली.  हडपसर परिसरात एका रस्त्यावर काही दिवसांपूर्वी माती सांडली त्यानंतर त्याच्यावर पाणी पडल्याने चिखल झाला होता. या चिखलामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडत होते. ही घटना नगरसेवक ससाणे आणि आबा तुपे यांनी पालिकेच्या अग्निशामक दलास कळविली.  पाण्याच्या बंबासह पोहचलेल्या अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी चिखलाचा रस्ता धुण्यास नकार दिला. याबाबत अग्निशामक दलाच्या प्रमुखांना फोन केल्यावर त्यांनी देखील हा रस्ता आम्हाला धुता येणार नसल्याचे सांगितले. या घटनेचे पडसाद सोमवारी पालिकेच्या मुख्यसभेत उमटले. शहरामध्ये कोणत्याही स्वरूपाची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अग्निशामक दलाने मदत करणे अपेक्षित आहे. चिखल काढण्यास नकार देणार्‍या अधिकार्‍यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी दोन्ही नगरसेवकांनी केली. याबाबत प्रभारी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी आपतकालीन परिस्थितीमध्ये काही संकेत पाहून मदत करणे आवश्यक असते. अग्निशामक विभागाकडून असा काही प्रकार झाला असेल तर यापुढे परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात येतील, असे सांगितले. 

भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताचा निधी जातो कुठे? 

शहरामध्ये भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होत आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेकडून लाखो रुपयांची तरतूद केली जाते. ही तरतूद दरवर्षी वाढविली जाते, यंदा तर दोन कोटीची तरतूद केली आहे, असे असताना दर वर्षी शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वरचेवर वाढतच आहे, मग या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी दरवर्षी केली जाणारी तरतूद आणि पैसा जातो कुठे, असा प्रश्‍न विचारत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

सभा तहकुबीवरून सत्ताधार्‍यांपुढे पेच

सभागृहनेत्यांनी जानेवारी महिन्याची सभा तहकुबी मांडल्यानंतर विरोधकांनी राजस्थानमधील इंग्रजी माध्यमातील आठवीच्या समाजशास्त्राच्या रेफरन्स बुकमध्ये लोकमान्य बाळ गंगाधार टिळक यांचा दहशतवादाचे जनक, असा वादग्रस्त उल्लेख केला आहे, हा मुद्दा उपस्थित करत टिळकांची बदनामी करणारा आक्षेपार्ह मजकूर काढून टाकावा, अशी मागणी करत काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी सभा तहकुबीची मागणी केली. सभागृहनेत्यांच्या तहकुबीनंतर टिळकांविषयीची तहकुबी आल्याने नेमका काय निर्णय घ्यावा, असा पेच सत्ताधार्‍यांपुढे निर्माण झाला. अखेर टिळकांबद्दलची सभा तहकुबी पुढील सर्वसाधारण सभेत मांडण्याचा निर्णय घेतला.