Mon, May 20, 2019 20:33होमपेज › Pune › पेपर फुटतो कसा...

पेपर फुटतो कसा...

Published On: May 25 2018 1:10AM | Last Updated: May 25 2018 12:33AMपुणे : लक्ष्मण खोत 

हल्ली अनेकदा आपण पेपर फुटल्याच्या घटना आपण पाहत असतो. आधी पेपर एक दिवस आधीच फुटायचे, आता त्याच दिवशी फुटतात! नुकत्याच झालेल्या दहावी परीक्षांमध्ये पेपर फुटल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या होत्या. त्यातच बुधवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाचा मेकॅनिक्सचा पेपरही व्हायरल झाल्याचे समोर आले. राज्यात वारंवार पेपर फुटण्याच्या घटना घडत असताना राज्याचा शिक्षण विभाग अथवा विद्यापीठ काही प्रतिबंधात्मक उपाय योजना करत नाहीत का, यावर पेपर कसा फुटतो याचा घेतलेला आढावा.

असा पाठवला जातो महाविद्यालयांना पेपर

विद्यापीठाद्वारे घेण्यात येणार्‍या सर्व परिक्षांच्या प्रश्नपत्रिका पाठविण्याची एक विशिष्ट पध्दत ठरविण्यात आली आहे. पूर्वी सर्व विषयांचे पेपर विद्यार्थी संख्येनुसार पाठवले जात. आठवडाभरापूर्वीच हे गठ्ठे महाविद्यालयांना मिळत. त्यामुळे पेपर फोडण्यासाठी वाव मिळत असे. यावर आळा घालण्यासाठी विद्यापीठाने पेपर सुरु होण्याअगोदर परिक्षेच्या स्वरुपानुसार अर्धा ते एक तासापूर्वी पेपर महाविद्यालयाच्या वेबसाईट वर पाठविण्यास सुरवात केली. 2013 पासून ही प्रक्रिया राबविली जाते. 

महाविद्यालयास वन टाईम पासवर्ड  

विद्यापीठाद्वारे पाठविण्यात आलेला पेपर डाऊनलोड करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयांना वन टाईम पासवडर्ड दिला जातो. हा पासवर्ड टाकल्यानंतरच महाविद्यालयांना तो डाऊनलोड करता येतो. त्यानंतर विद्यार्थी संख्येनुसार पेपरच्या प्रिंन्ट काढल्या जातात. 

पेपर कसा फुटतो.. 

वेबसाईट च्या माध्यमातून आल्यानंतरही पेपर फुटण्याच्या दोन शक्यता आहेत. एक म्हणजे महाविद्यालयाला पेपर मिळाल्यानंतर विद्यार्थी संख्येएवढ्या प्रती काढताना पेपर कर्मचार्‍यांद्वारे फुटू शकतो. महाविद्यालयाचे कर्मचारी मोबाईलच्या सहाय्याने प्रश्नपत्रिकेच्या फोटो कॉपी काढून, सोशल माध्यमांवर व्हायरल करु शकतात. तर दुसरी शक्यता अशी की, विद्यापीठाचा वेबमेल अथवा महाविद्यालयाची वेबसाईट हॅक करुन विद्यार्थी पेपर फोडू शकतात. 

विद्यार्थी पेपर व्हायरल कसा करतात...

विद्यार्थी मोबाईल सोबत घेऊन पेपरला बसला असेल, तर विद्यार्थी प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर मोबाईलच्या सह्याय्याने फोटो काढून विद्यार्थी प्रश्नपत्रिका व्हायरल करु शकतो. तसेच विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यार्थी परिक्षा सुरु झाल्यानंतर अर्धा तासाने परीक्षा केंद्राबाहेर पडू शकतो. त्यानंतर विद्यार्थी प्रश्नपत्रिका व्हायरल करण्याची शक्यता असते.

विद्यापीठाचा नियम काय... 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पेपरफुटीच्या  प्रकारावर आळा घालण्यासाठी महाविद्यालयांनी पेपर सुरु असताना विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेसह बाहेर पडू देऊ नये, अशा सूचना गेल्या वर्षी लेखी दिल्याची माहिती परिक्षा विभागातील अधिकार्‍यांनी दिली. विद्यार्थ्याला वेळे अगोदर जायचे असल्यास त्याच्याकडे असलेली प्रश्नपत्रिका काढून घेण्याच्या सूचना आहेत. परीक्षा केंद्रावर याचे पालन होत नसल्याने हे प्रकार घडत असल्याचे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले. 

फुटला आणि व्हायरल?

विविध परीक्षांचा पेपर परिक्षेपूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात पडला असल्यास त्याला पेपर फुटला असे म्हटले जाते. आणि जर परीक्षा सुरु झाल्यानंतर वेगवेगळ्या मार्गाने पेपर सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यास त्याला पेपर व्हायरल झाला, असे म्हटले जाते.