Sun, Aug 25, 2019 12:18होमपेज › Pune › होर्डिंग्जमुळे किती बळी जाणार?

होर्डिंग्जमुळे किती बळी जाणार?

Published On: Jun 03 2018 1:18AM | Last Updated: Jun 03 2018 12:44AMपिंपरी : प्रतिनिधी

नुकताच शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. परंतु पावसाच्या आगमनाने महापालिकेच्या भोंगळ कारभार पुन्हा उघडकीस आला. नागरिक एकीकडे पावसाचा आनंद लुटत असताना दोन निरपराध नागरिकांना होर्डिंग्जमुळे आपला जीव गमवावा लागला. ते होर्डिंग्ज वैध होते  की, अवैध याबाबत नागरिकांना काहीही सोयरेसुतक नसून शहरात होर्डिंग्ज लावायची गरजच काय? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. 

यापूर्वीही देशभरात विविध ठिकाणी केवळ होर्डिंग्ज अंगावर पडल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.  परंतु या घटनानंतरही होर्डिंग्जद्वारे चमकोगिरी करणार्‍यांना मात्र चाप बसला नसून अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्ज लावून शहराला बकाल करण्याचे काम सुरुच आहे. पिंपरी चिंचवड शहरात शुक्रवारी (दि.1) होर्डीग्ज अंगावर कोसळून वेगवेगळ्या ठिकाणी दोन निरपराध व्यक्तींचा जीव गेला. परंतू शहरात अनेक ठिकाणी फुकटातील चमकोगिरी सुरूच असल्याचे चित्र शनिवारीही कायम होते. त्यामुळे आता या होर्डींग्जबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण घटनांमध्ये पालिका प्रशासनाची उदासीनता असल्याची तक्रार नागरीकांनी केली आहे. 

होर्डींग्जमुळे अनेकदा श्रेयवादामुळे गुन्हे घडतात. तसेच हाणामार्‍या देखील होतात. मुख्य म्हणजे मोठमोठी होर्डींग्ज लावल्याने शहराचे विद्रुपीकरण होते. तसेच अनेकदा होर्डींग्ज कोसळून आजवर गंभीर अपघात घडले आहेत. परंतू या सर्व प्रकारात महापालिका प्रशासन जाणूनबूजून दुर्लक्ष करत आहे. 

नागरीकांनी याबाबत अनेकदा तक्रारी केल्या आहेत. परंतू संबंधित विभागाकडून हे होर्डींग्ज अधिकृत आहेत तसेच मुदत संपल्यानंतर काढण्यात येतील अशी उडवाउडवीची उत्तरे देउऩ कारवाई करण्याबाबात टाळाटाळ केली जात असल्याचे तक्रार नागरीकांनी केली आहे, 

शहरात राजरोस अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डींग्ज उभारली जातात. परंतू आजवर शहर विद्रुपीकरण करणार्‍यांवर  तसेच अनधिकृत होर्डींग्जला चाप लावण्यासाठी असे होर्डिंग काढून घेण्यासंदर्भात महापालिकेकडून संबंधितांना साधी नोटीसही बजावली जात नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तसेच  शहरात झळकत असलेल्या अनधिकृत होर्डिंग्ज लावणार्‍या व्यक्तीवर व मंडळांवर, जाहीरात एजन्सी तसेच संबंधित व्यक्तीविरोधात पोलिसांमध्ये साधी एक तक्रारही नोंदवण्यात आली  नाही. त्यामुळे अनेकांची हिमत वाढली असून आता गल्लीबोळात होर्डींग्ज नजरेस पडू लागले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असून या होर्डींग्जबाजीला चाप बसवावा, अशी मागणी नागरीक करत आहेत. 
शहरातील डिव्हायडर तसेच मुख्य चौक, कॉलेज कॅम्पस व सिग्नल्सवर होर्डिंग्जचे वारेमाप पीक वाढले आहे. गेल्या काही वर्षांपासून ही समस्या नागरीकांना भेडसावत असून महापालिका व पोलिसांकडून मात्र काहीही कारवाई होत नसल्याबद्दल नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

याबाबत यंत्रणांची हे वेळकाढू धोरण राजकीय पक्षांना तसेच जाहीरातबाजी करणार्‍यांना प्रोत्साहनच देत असून यामुळे किती निरपराधाचे बळी जाणार असा सवाल नागरीकांतून उठत आहे.