Tue, Jun 25, 2019 13:13होमपेज › Pune › रस्ता नसलेल्या शाळेस परवानगी मिळाली कशी?

रस्ता नसलेल्या शाळेस परवानगी मिळाली कशी?

Published On: Jul 06 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 12:12AMकामशेत : वार्ताहर 

खामशेत येथील जीजस ख्राईस्ट इंग्लिश मेडीयम स्कूल डोंगराच्या पायथ्यालगत भरत असल्याने येथील विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी सध्यातरी पक्का रस्ता उपलब्ध नाही. शाळा प्रशासनाने तात्पुरता रस्ता बनविलेला असल्याने, विद्यार्थ्यांना चिखल तुडवडत मुख्य रस्त्यापर्यंत साधारणत: किलोमीटर अंतर पायी चालावे लागत आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना कसरत करत चालत जावे लागत असल्याने; तसेच  रस्ता नसूनही शाळेस परवानगी मिळाली कशी, असा प्रश्‍न पालकांतून उपस्थित केला जात आहे. 

सध्या या शाळेत सुमारे 750 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जीजस ख्राईस्ट इंग्लिश मेडीयम स्कूलला काही महिन्यांपूर्वीच शासनाकडून परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे डोंगरा पायथ्यालगत रस्ता नसलेल्या व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून कुठलीही परवानगी न घेता डोंगरात बांधकामाचे नियम डावलत  या शाळेची इमारत बांधलेली असताना शासनाने या शाळेस परवानगी कशी दिली असा प्रश्न अनेकांना पडला आहे या शाळेस ‘पीएमआरडी’ कडून अनधिकृत बांधकाम केल्याने कायदेशीर नोटीस देखील बजाविण्यात आलेली आहे. ही शाळा डोंगरातील टेकडीच्या पायथ्याशी उत्खनन करून व नैसर्गिक पाण्याचे  प्रवाह अडवून बांधलेली असल्याने पावसाळ्यात कधीही  दरड कोसळण्याची व त्यामुळे शाळा इमारतीस धोका पोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मावळात याआधी अनेकदा दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडलेल्या आहेत; तसेच माळीण सारखी मोठी दुर्घटना घडली असतानादेखील अशा धोकादायक ठिकाणी शाळा बांधण्याचे धाडस करणारी संबंधित संस्था विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकत आहे काय, अस प्रश्‍न निर्माण होत आहे; तसेच शाळा गावापासून लांब व डोंगरात असल्याने अनेक वन्य प्राणी देखील परिसरात वावरत असतात. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाता येता  पिसाळलेले कुत्रे चावण्याच्या घटना घडलेल्या आहेत.  यासंदर्भात संस्थेचे व्यवस्थापक दास आरोग्य राजा यांना याविषयी विचारले असता   ते म्हणाले की, आम्ही शाळेकडे जाणारा पक्का रस्ता बनविण्यासाठी प्रयत्न करत आहोत; तसेच रस्ता करणे न शक्य झाल्यास आम्ही शाळा दुसर्‍या ठिकाणी स्थलांतरित करणार आहोत.