Thu, Mar 21, 2019 16:02होमपेज › Pune › राज ठाकरेंनी पालिकेकडे मागविली ‘बालगंधर्व’च्या आराखड्याची माहिती

राज ठाकरेंनी पालिकेकडे मागविली ‘बालगंधर्व’च्या आराखड्याची माहिती

Published On: Mar 14 2018 1:19AM | Last Updated: Mar 14 2018 12:02AMपुणे : प्रतिनिधी

बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिकेच्या आराखड्याची माहिती मागविली आहे. महापालिका नक्की कशा पद्धतीने ‘बालगंधर्व’चा पुनर्विकास करणार आहे, हे तपासून ते आपली भूमिका मांडणार आहेत.

बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकास योजनेवरून सध्या वादंग उठले आहे. त्यात ‘बालगंधर्व’च्या पुनर्विकासाची संकल्पना सर्वात आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली असल्याचे दै. ‘पुढारी’ने उजेडात आणले होते, असे असतानाही या विषयावर आता मनसे गप्प का, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. यासंबंधीचे वृत्त बुधवारी प्रकाशित झाले, त्यावर ठाकरे यांनी मुंबईत बोलावलेल्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली. ठाकरे यांनी महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांच्याशी याबाबत चर्चा करून महापालिका नक्की कशा पद्धतीने बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करणार आहे, यासंबंधी पालिकेने केलेला आराखडा तातडीने पाठविण्याची सूचना केली, ते पाहून आपण आपली भूमिका मांडू, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

दरम्यान याबाबत बोलताना मनसेचे गटनेते मोरे म्हणाले, ठाकरेंच्या सूचनेनुसार महापालिकेकडे बालगंधर्वच्या पुनर्विकासाबाबत काय आराखडा तयार केला आहे, याची तपासणी केली असता पालिकेकडे अद्याप काहीच नसल्याचे सांगण्यात आले, त्यानंतर माजी  स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्याशी याबाबत चर्चा केली, त्यावर त्यांनी ठाकरे यांनी मांडलेल्या बालगंधर्वच्या संकल्पनेचा पुनर्विकासाच्या योजनेचा आणि पुणेकरांची तसेच कलाकारांची मते आणि सूचना विचारात घेऊन या वास्तूचा पुनर्विकास करण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान याबाबत ठाकरे यांच्याशी पुन्हा बोलून भूमिका स्पष्ट करू, असे मोरे यांनी सांगितले.