Tue, Jul 16, 2019 09:41होमपेज › Pune › प्रश्‍नपत्रिका ‘मेट्रो’ची

प्रश्‍नपत्रिका ‘मेट्रो’ची

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 11 2018 12:25AMकेंद्र आणि राज्याप्रमाणे महापालिकेतही आम्हाला स्पष्ट बहुमताने निवडून द्या, तुमची सारी स्वप्ने साकार करून दाखवू, असे आश्वासन दिलेल्या भारतीय जनता पक्षाला फक्त पुणेकरांनीच नव्हे, तर पिंपरी-चिंचवडकरांनींही घसघशीत बहुमताने सत्ता दिली. या वर्षभरात कोणकोणती कामे भाजपने केली, कोणती प्रगतीपथावर आहेत, कोणते नवे प्रकल्प येऊ घातले आहेत, कोणते संकल्प सोडले जात आहेत, याचे रंगीबेरंगी अहवालही प्रसिद्ध होऊ लागले आहेत. मात्र याचबरोबर लोकहिताची अनेक कामे रखडली आहेत.

तोंडावर आलेल्या निवडणुकीत सत्ताधार्‍यांना त्याची उत्तरे द्यावी लागणार आहेत. याची तालीम नगरसेवकांपासून आमदार-खासदार-मंत्र्यांपर्यंत आपल्या लोकप्रतिनिधींना करता यावी, या हेतूने एकेका विषयाचे प्रगतीपुस्तक ‘पुढारी’तून सादर करण्यात येणार आहे. त्यातील पहिली प्रश्नपत्रिका आहे ’मेट्रो’ची. तब्बल दहा वर्षे फक्त कागदावर राहिलेल्या, पण पालिकेत भाजप सत्तेवर आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या मेट्रोचे काम सुरू होऊनही एक वर्ष झाले. पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गिकांची कामे वेगाने सुरु असून मागणी केल्यास वनाजपासून चांदणी चौकापर्यंत तसेच स्वारगेटपासून कात्रजपर्यंत मार्गिकांचा विस्तार करण्याची तयारी ’महामेट्रो’ने दाखविली आहे. एवढेच नव्हे, तर ‘पीएमआरडीए’तर्फे हाती घेतल्या 

जात असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या तिसर्‍या मार्गिकेचा विस्तार हडपसर-मांजरीपर्यंत करण्यासही हिरवा कंदील  मिळण्याची शक्यता आहे. पुणे,पिंपरी-चिंचवड आणि परिसराचा कायापालट करू 
शकणार्‍या अशा या मेट्रोबाबत आपले लोकप्रतिनिधी कितपत जागरूक आहेत, याची ही चाचपणी...

सर्वेक्षणाची गरज...

महामेट्रो आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गांचे काम प्रगतिशिल पथावर आहे. या कामांसह सध्या शहरात अजून काही ठिकाणी मेट्रोची मागणी करण्यात येत आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड ते निगडी, स्वारगेट ते कात्रज, शिवाजीनगर ते मांजरी असा मेट्रो विस्तार प्रस्तावित आहे. याठिकाणी मेट्रो मार्गाचे काम भविष्यात सुरू करायचे असल्यास त्याचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.

पुनर्विकास  रखडला

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी ते रेंजहिल्स मार्गाचे काम गेल्या मे महिन्यापासून, तर वनाझ ते शिवाजीनगर धान्य गोदाम मार्गाचे काम गेल्या सप्टेंबरपासून सुरू झाले. मेट्रो मार्गिकांच्या दोन्ही बाजूस पाचशे मीटरपर्यंत टीओडी झोन निश्चित करून या ठिकाणी वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याचे जाहीर करण्यात आले होते. महापालिकेच्या विकास आराखड्यात (डीपी) आणि विकास नियंत्रण नियमावलीत (डीसी रूल्स) त्याबाबतची तरतूद केली गेली. रस्त्याच्या रुंदीनुसार चार एफएसआय मिळणार असल्याने अनेक जुन्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास मार्गी लागण्याची शक्यता होती; परंतु मेट्रो मार्गिंकासाठी टीओडी झोनच राज्य सरकारने अद्याप निश्चित केलेला नाही. टीओडी झोन ठरविण्यात आला नसल्याने या भागात सध्या महापालिकेकडून मूलभूत नियमांनुसार बांधकाम परवानगी देण्यात येत आहे. त्याचा फटका जुन्या सोसायट्या आणि तेथे पुनर्विकास करू इच्छिणार्‍या बांधकाम व्यावसायिकांना बसत आहे. जादा एफएसआय वापरण्याची मुभा असतानाही, केवळ टीओडी झोन निश्चित नसल्याने कमी ’एफएसआय’मध्ये बांधकाम करावे लागत असल्याची तक्रार बांधकाम व्यावसायिकांकडून केली जात आहे.

मेट्रो प्रकल्प टप्पा 1 एकूण लांबी 31.254 कि.मी.

मार्गिका क्र.1 : पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेची लांबी 16.59 कि. मी. पैकी 11.57 कि.मी. उन्नत व 5.02 किे. मी. भूमिगत असून या मार्गिकेवर 9 उन्नत स्टेशन असून 6 भूमिगत स्टेशनचा समावेश आहे.

मार्गिका क्र.2 : वनाज ते रामवाडी या मार्गिकेची लांबी 14.665 कि. मी. इतकी असणार आहे व त्यावर 16 उन्नत स्टेशन्स असणार आहेत.

मार्गिका क्र.3 : हिंजवडी ते शिवाजीनगर 23 कि. मी. ती  पुढे मांजरीपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे.

शिवाजीनगर येथे मेट्रो स्टेशनसाठी गोदामाच्या जागेची नुकतीच मी पाहणी केली आहे. लवकरच जागा ताब्यात घेऊन त्याठिकाणी काम सुरू केले जाणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या पीएमआरडीएच्या मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. त्याचबरोबर महामेट्रोतर्फे होणार्‍या वनाज-स्वारगेट आणि वनाज-शिवाजीनगर-रामवाडी (चंदननगर) या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे लवकरच पुणेकरांना मेट्रोतून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे. - गिरीश बापट, पालकमंत्री  

वाहतुकीची समस्या सोडविण्याकरीता शहराला मेट्रोची नितांत गरज आहे. पिंपरी ते शिवाजीनगर व शिवाजी नगर ते स्वारगेट असा पहिला टप्पा असणार आहे. शिवाजीनगरपासन स्वारगेटकडे जाणारा मार्ग हा सिटीतून जात असल्याने तो भूमिगत करण्यात आला आहे. कोथरूड ते रामवाडी व स्वारगेट ते हडपसरकडे जाणार्‍या मार्गामुळे कॅन्टोमेन्ट भागातील नागरिकांनाही मेट्रोचा लाभ घेता येणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर तिसर्‍या मार्गिकेच्या कामाकरीता मंजुरी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे मेट्रोचे काम सध्या जोरात सुरू असल्याने लवकरच मेट्रोचा लाभ नागरिकांना घेता येईल. बाधित लोकांचे प्रश्‍नही सोडविण्यात येणार आहे.  -दिलीप कांबळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री

हिंजवडीपासून शिवाजीनगरपर्यंत येणार्‍या मार्ग 3 चा विस्तार हडपसर-मांजरीगांवपर्यंत करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यास नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या बैठाकीत मंजुरी मिळाली आहे. शिवाजीनगर ते हडपसर-मांजरी या ठिकाणी मेट्रोच्या कामासाठी मंजुरी मिळाली. मेट्रो करता जागा संपादित करून कामे पूर्ण केली जातील. प्रामुख्याने हडपसर परिसरातील वाहतूक कोंडी समस्या व नागरिकांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. मांजरी भागासाठी मेट्रो फायदेशीर ठरणार  आहे. - योगेश टिळेकर, आमदार

रामवाडी ते शिवाजीनगर काम लवकर सुरू व्हावे यासाठी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांची आपण नागपूर येथे भेट घेतली होती. मेट्रोचे काम रामवाडी ते शिवाजीनगर लवकर सुरु करणार  असल्याचे   डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले होते. मेट्रोचा मार्ग  रामवाडीपासून  वाघोली पर्यत वाढविण्यात यावा याची मागणी देखील केली व तसे पत्र देखील मी दिले आहेे. नागरिकांच्या सोयीसाठी बस स्थानके, रेल्वेस्टेशन सुद्धा एकमेकांना जोडणार असून पर्यायी मार्गांचा देखील अभ्यास करणार असल्याचे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक  डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी आश्‍वासन दिले आहे.- जगदीश मुळीक , आमदार