Fri, Jul 19, 2019 21:59होमपेज › Pune › गृहिणी देत आहेत ‘वेस्ट मॅनेजमेंट’चे धडे 

गृहिणी देत आहेत ‘वेस्ट मॅनेजमेंट’चे धडे 

Published On: Dec 05 2017 1:45AM | Last Updated: Dec 04 2017 11:04PM

बुकमार्क करा

पिंपरी : वर्षा कांबळे 

आपल्या वापरातील एखादी वस्तू जुनी  झाली की, घराच्या अडगळीत पडते आणि नंतर कचर्‍यात जाते. दररोज अशा कितीतरी वस्तूंचा कचरा होताना आपण पाहतोे; मात्र पिंपरी-चिंचवड येथील प्रेरणा ग्रुपच्या महिलांनी एकत्र येऊन अशा टाकाऊ वस्तूंपासून सुरेख दागिने साकारून एका व्यवसायाची उभारणी केली आहे. नुकत्याच झालेल्या जागृती यात्रा नावाच्या स्पर्धेत या महिलांनी द्वितीय पारितोषिक पटकावले आहे.

25 राज्यांमधून जवळपास 430 संघांमधून ‘वेस्ट मॅनेजमेंट’च्या या उपक्रमाबद्दल प्रेरणा ग्रुपने हे यश मिळविले आहे. रहाटणी परिसरात राहणार्‍या प्रेरणा ग्रुपच्या महिलांनी या उपक्रमाद्वारे आपल्या घराला हातभार लावला आहे. समाजाला आहे त्या वस्तूंचा पुनर्वापर करण्याचा संदेशही त्या देतात. त्यांनी आपली ही कला भारतभर पोचवण्यासाठीही प्रयत्न केला आहे. 

सुरुवातीला अगदी पाच ते सात महिलांपासून सुरू झालेल्या या प्रेरणा ग्रुपमध्ये आता बारा जणी आहेत. या कामाला सुरुवात करताना बिया, जुने कापड अशा वस्तू एकत्र केल्या. त्यातून काय आणि कसे दागिने करता येतील यांवर प्रयोग केले. त्यातून चांगली डिझाईन निवडले. महिलांना आवडतील अशा दागिन्यांची निर्मिती केली. अगदी फळांच्या बिया, मणी, जुने कापड, बाटल्या, वायर, पुठ्ठा यांचा वापर या महिला कलात्मक पद्धतीने करतात. यात गळ्यातल्या माळा, कानातले, बटवे, पिशव्या अशा वेगवेगळ्या वस्तू त्या साकारतात. 

महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठेत स्थान  मिळावे यासाठी अबिरा क्रिएशन या महिलांसाठी काम करणार्‍या संस्थेने मदत केली. संस्थेच्या संस्थापिका प्रियंका खंडेलवाल या अशा गरजू महिलांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्याकरिता विविध कार्यशाळा घेणे, त्यांना निर्मितीसाठी साह्य करणे यासाठी काम करतात.  प्रेरणा ग्रुपच्या महिलांनाही त्यांनी बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. यातून या महिलांना त्याचा चांगला फायदा होत आहे.   

महिलांनी तयार केलेल्या या वस्तूंना देशातील विविध भागांतून मागणी वाढत आहे. सुरुवातीला अगदी शून्यातून सुरुवात केलेल्या या महिलांना  महिना प्रत्येकी पाच ते सहा हजार रुपये मिळतात. त्यांची आवड जपून घरखर्चाला हातभार लागतो हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. कोणतीही पार्श्‍वभूमी नसताना त्यांनी हा व्यवसाय सुरू करत इतर महिलांनाही यातून प्रेरणा दिली आहे.