Wed, Aug 21, 2019 02:33होमपेज › Pune › मलनिस्सारण प्रकल्पामुळे बाधित कुंटुबांना घर देणार

मलनिस्सारण प्रकल्पामुळे बाधित कुंटुबांना घर देणार

Published On: Jan 19 2018 1:55AM | Last Updated: Jan 19 2018 1:09AMपुणे : प्रतिनिधी 

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत सुमारे 900 एमएलडी मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांमुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे. ही बाब लक्षात घेऊन या भागात राहत असलेल्या नागरिकांना तात्पुरती भाडेतत्त्वावर घरे देण्याचा निर्णय बोर्ड प्रशासनाने घेतलेला आहे. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत या बाधित कुटुंबांना भाड्याच्या घरात स्थलांतरित केले जाणार आहे. तसेच या घरांचे भाडे प्रशासनाच्या वतीने भरण्यात येणार आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत प्रथमच मैलापाण्याचा निचरा करण्यासाठी बुटी स्ट्रीट येथे 900 एमएलडी क्षमतेचा मलनिस्सारण प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. हा प्रकल्प मार्च महिन्यात कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्या दृष्ट्रीने प्रकल्पाचे काम जोरात सुरू असून ते सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र पुढील राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी  या प्रकल्पाजवळ असलेल्या काही कुटुंबांमुळे अडचणी येत आहे.

त्यामुळे काम रखडले आहे. तसेच काही दुकानदारांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे. दुकादारांनी केलेले अतिक्रमण काढण्यात येणार आहे. तर संबंधित नागरिकांना जागा रिकामी करण्यासाठी प्रशासनाने नोटीस बजावली आहे. त्यानुसार या नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच नगरसेवकांची भेट घेतली होती आणि पर्यायी जागा देण्याबाबत विनंती केली  होती. 

या मलनिस्सारण प्रकल्पासाठी पाईपलाईन टाकणे, तसेच इतर कामे करण्यासाठी जागेची अत्यंत आवश्यकता आहे. याबाबत सर्वसाधारण सभेत चर्चा करण्यात आली. त्यावर या नागरिकांचे दुसर्‍या जागेत स्थलांतर करणे अवघड होईल, असे मत नगरसेवक अशोक पवार यांनी मांडले. त्यामुळे बाधित नागरिकांची निवासाची तात्पुरती व्यवस्था करण्यात येणार आहे, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या नागरिकांना तात्पुरत्या भाड्याच्या घरात स्थलांतरित करण्यात येणार आहे. तसेच घरांचे भाडे प्रशासनाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.