Sun, Jul 21, 2019 16:47
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › घरगुती शौचालये मलवाहिनीविनाच 

घरगुती शौचालये मलवाहिनीविनाच 

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 03 2018 12:26AMपिंपरी : प्रतिनिधी

भोसरी एमआयडीसीतील बालाजीनगर झोपडपट्टीतील अनेक घरांमध्ये वैयक्‍तिक शौचालये पिंपरी-चिंचवड महापालिकेने बांधून दिली आहेत. मात्र, सव्वा वर्ष उलटूनही ड्रेेनेज लाईनची जोडणी न केल्याने मैलापाणी थेट उघड्या गटारातून वाहत आहेत. परिणामी, परिसरात दुर्गंधी सुटून आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अधिकारी चालढकल करीत आहेत. ही परिस्थिती शहरातील अनेक झोपडपट्ट्यांत आहे. 

केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पालिका शौचालय नसलेल्या झोपडपट्टी, चाळ कॉलनी व नागरी वस्तीच्या ठिकाणी वैयक्तिक घरगुती शौचालय मोफत बांधून देत आहे. त्यासाठी लाभार्थ्यास 16 हजार रूपये अनुदान दिले जाते. मात्र, स्वच्छ भारत अभियानामध्ये शासनाने दिलेले ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी झोपडपट्टी भागात मोठ्या संख्येने वैयक्तिक शौचालये बांधून देण्यात येत आहेत. शौचालयातील मैलासांडपाणी उघड्या गटारातून वाहत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटून आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यांना नाईलास्तव सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागत आहे. तर, काही जण उघड्यावर शौचास बसतात. याबाबत ‘पुढारी’ने ‘ड्रेनेज नसतानाही घराघरांत शौचालय’ या शीर्षकाखाली छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावर कारवाई करीत पालिका प्रशासनाने कामास सुरूवात केली. मात्र, ते काम अर्धवट स्थितीतच सोडून दिले आहे.  या संदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांना गेल्या वर्षी तब्बल तीन वेळा त्रस्त रहिवाशांनी छायाचित्रांसह तक्रार केली. आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना देऊनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. याबाबत शुक्रवारी आयुक्तांकडे पुन्हा तक्रार करण्यात आली. येत्या 15 दिवसांमध्ये ड्रेनेज लाईन न जोडल्यास मैलापाणी पालिका भवनात आणून टाकण्याचा इशारा समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष रफिक कुरेशी यांनी दिला आहे. यावेळी पक्षाचे शहर उपाध्यक्ष सालार शेख, बाबा नदाफ, जावेश शहा, बाळा काळे, राहुल जाधव, लालासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते. 

लाभार्थ्यांना अनधिकृत झोपडी म्हणून नोटिसा

अनुदानाच्या रकमेत स्वत:ची काही रक्‍कम घालून रहिवाशांनी हौसेने घरात शौचालय बांधून घेतले. सव्वा ते दीड वर्षे होत आली तरी अद्याप त्याला ड्रेनेज लाईनचा जोड न दिल्याने रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. उलट काही रहिवाशांना अनधिकृत झोपड्या असल्याच्या नोटिसा पालिकेने दिल्या आहेत. पालिकेचे अधिकारी येऊन केवळ पाहणी करून जातात. परिसरात खडक लागला असल्याने ड्रेनेज लाईनचे काम करता येत नसल्याचे रफिक कुरेशी यांनी सांगितले.

Tags : Pimpri, Household, toilets, ointments