Tue, Mar 19, 2019 11:21होमपेज › Pune › घरगुती वीजजोडणीला मोजा ५ ते १५ हजार 

घरगुती वीजजोडणीला मोजा ५ ते १५ हजार 

Published On: Jan 19 2018 1:55AM | Last Updated: Jan 18 2018 11:54PMपुणे : शिवाजी शिंदे 

महावितरणच्या पुणे परिमंडलात नागरिकांना नवीन वीजजोडणी घेणे अवघड होत चालले आहे. सर्व कार्यालयांतील अभियंते आणि वायरमन यांच्या संगनमताने ‘एजंटगिरी’चा गोरखधंदा जोमाने सुरू असून, घरगुती वीजजोडणी घ्यावयाची असल्यास किमान पाच ते पंधरा हजार रुपये मोजण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे नागरिक अभियंते आणि कर्मचार्‍यांवर वैतागले आहेत. 

महावितरणच्या पुणे परिमंडलात मागील सुमारे सहा ते सात महिन्यांपासून नवीन वीज जोडणीसाठी हजारो अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र, त्या बदल्यात नागरिकांना वेळेत वीजजोडणी मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. पुणे शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मध्यवर्ती भागापेक्षा उपनगरात घर घेणार्‍यांची संख्या जास्त आहे. नागरिकांनी ऑनलाइन, तसेच मॅन्युअली अर्ज महावितरणच्या उपकार्यालयाकडे केल्यास नियमानुसार किमान तीस दिवसांत वीजजोडणी मिळणे आवश्यक आहे.

वास्तविक पाहता घरगुती वीजजोडणी घ्यावयाची असल्यास साधारणपणे पंधराशे ते दोन हजार रुपये अनामत रक्कम द्यावी लागते. त्यानुसार वीज मीटर, केबल वायर आणि इतर आवश्यक असलेले साहित्य हे महावितरण कंपनीच देत असते. परंतु, नागरिकांनी वीज मीटरसाठी आवश्यक असलेली अनामत रक्कम अर्जाबरोबर भरल्यानंतरसुद्धा उपकार्यालयातील अभियंते आणि वायरमन हे मनमानी कारभार करीत संबंधित नागरिकांना वारंवार हेलपाटे मारण्यास भाग पाडत असल्याचे चित्र उपकार्यालयामधून दिसून येत आहे. एजंटगिरीच्या गोरखधंद्यामधून मिळणार्‍या प्रचंड रकमेमुळे अप्रत्यक्षरित्या अभियंते आणि वायरमन हे एजंटाच्या हातचे बाहुलेच बनले आहेत. त्यामुळे एजंट म्हणतील तसाच कारभार महावितरणच्या उपकार्यालयामधून सध्या सुरू असलेला पाहावयास मिळत आहे.     

मुख्य अभियंता पद शोभेचे बाहुले

महावितरण वीज कंपनीच्या परिमंडलातील मुख्य अभियंता हे पद अतिशय महत्त्वाचे आहे. उपकार्यालयातील कारभारावर नियंत्रण ठेवण्याचे काम या अभियंत्यावर असते. मात्र, मागील काही वर्षामध्ये महावितरणने अधिकाराचे विभाजन केले आहे. त्यामुळे मुख्य अभियंता हे पद केवळ शोभेचे बनले आहे की काय, असे म्हणण्याची वेळ आली आहे.