Fri, Apr 26, 2019 19:19होमपेज › Pune › खासगी व पालिकेचे दवाखाने रुग्णांनी झाले फुल्ल

खासगी व पालिकेचे दवाखाने रुग्णांनी झाले फुल्ल

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 11 2018 12:44AMयेरवडा : वार्ताहर

येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत साथीचे आजारांमध्ये वाढ झाली आहे. आठवड्यातून डेंग्यूचे तीन संशयीत रूग्ण आढळून येत आहेत. पाऊस मुळे ठीकठीकाणी तयार झालेली पाण्याची डबकी तसेच आजारपणाला वातावरण पोषक असल्याने खाजगी दवाखान्यांसह महापालिकेचे दवाखान्यात गर्दी पहायला मिळते. लहान मुले व वयोवृध्दांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. येरवडा क्षेत्रीय कार्यालयाकडील कीटक नाशक विभागाच्यावतीने तक्रार आल्यानंतर तसेच डेंग्यूचा संशयीत रूग्ण आढळल्यानंतर औषध फवारणी व पाण्याच्या टाकीक्यांमध्ये अबेटींग औषध टाकण्यासाठी कर्मचारी पाठविले जातात. तर येरवडा क्षेत्रीय कार्यालयाकडे पूणवेळ वैद्यकीय अधिकारी नाही, त्यामुळे आरोग्य विभाग वार्‍यावरच असल्याचे सद्यस्थितीत चित्र आहे.  

उपनगरात डेंग्यूने हळूहळू डोके वर काढायला सुरूवात केली आहे. डेंग्यूबरोबर इतर साथीचे आजारांचा देखील फैलाव होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर आणि उपनगरांत पडत असलेल्या पावसामुळे महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. रस्त्यावर आणि घराच्या टेरेसवर साचणार्‍या पाण्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आठवड्याततून सुमारे तीनहून अधिक संशयीत डेंग्यूचे रूग्ण आढळून येत आहेत. वातावरण खराब असल्यामुळे वेगवेगळ्या आजारांनी रूग्ण त्रस्त आहेत. लहान मुले, वयोवृध्द तर आजारपणातून लवकर बरे होताना दिसत नाहीत. परिणामी खाजगी रूग्णालये व महापालिकेची रूग्णालयांमध्ये गर्दी होताना दिसत आहे. येरवडा येथे डेंग्यू तपासणी केंद्र नसल्यामुळे रूग्णांना नायडू रूग्णालयात जावे लागते. 

येरवडा येथील महापालिकेच्या  स्व. राजीव गांधी रूग्णालयात  साथीच्या आजारावर सर्व निदान, उपचार याठिकाणी केले जात आहेत. याठिकाणी दररोज सुमारे साडेचारशे बाह्य रूग्णांची तपासणी याठिकाणी केली जात आहे. येरवडा क्षेत्रीय कार्यालयाकडे पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी नाही. सध्या डॉ.तिरूपती पांचाळ यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडे ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचा चार्ज असल्यामुळे ते येरवडा क्षेत्रीय कार्यालयाकडे येत नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाचा कारभार वैद्यकीय अधिकारी विना सुरूच आहे. डॉ.पांचाळ यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. 

औषध फवारणीसाठी कर्मचार्‍यांची कमतरता 

सध्या औषध फवारणी करण्यासाठी केवळ 16 कर्मचारी आहेत. तर 12 कर्मचारी डास उत्पत्ती केंद्र शोधून त्यामध्ये औषध टाकण्याचे काम करतात. खाजगी रूग्णालयात जावून त्याठिकाणाच्या रुग्णांची माहिती देखील संकलित केली जाते. ज्या ठिकाणांची तक्रार येते तेथे लागलीच औषध फवारणी केली जाते. अन्यथा इतर ठिकाणी मात्र आठ ते दहा दिवसानंतर एकदा फवारणी होते. पाण्याची डबकी साचलेल्या ठिकाणी जावून संबंधितांना पाण्याचा निचरा करण्यासाठी सूचना केली जाते. त्याठिकाणचे पाणी काढून घेतल्यानंतर तेथे औषध फवारणी केली जाते. या भागात मात्र अद्याप साथीचे आजार बळावले नसल्याचे कीटक नाशक विभागाने माहिती दिली.