Fri, Apr 19, 2019 11:59होमपेज › Pune › वैद्यकीय समाजसेवक बनले रुग्णालयांचे ‘चेले’

वैद्यकीय समाजसेवक बनले रुग्णालयांचे ‘चेले’

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 23 2018 12:56AMपुणे : प्रतिनिधी

धर्मादाय रुग्णालयांतील वैद्यकीय समाजसेवक हे रुग्णालयांचे ‘चेले’ बनल्याचे चित्र बहुतांश रुग्णालयात पाहायला मिळत आहे. गरीब व गरजू रुग्णांप्रति सहानूभूती दाखवून त्यांच्यासाठी असलेल्या सवलतींची माहिती देण्याऐवजी रुग्णांना ते गुन्हेगार असल्यासारखी वागणूक देत आहेत. यामध्ये रुग्णांना दरडावून बोलणे, माहिती देण्यास टाळाटाळ करणे, दिशाभूल करणे असे प्रकार वैद्यकीय समाजसेवक करीत आहेत. उपचाराच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला तातडीने मदत करण्याऐवजी रुग्णालयाच्या बाजूनेच हे समाजसेवक काम करीत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. रुग्णांवर दादागिरी करणार्‍या या ‘चेल्या’ची नेमकी तक्रार कुणाकडे करायची अशा प्रश्‍न लाभार्थी रुग्णांना पडत आहे.

धर्मादाय रुग्णालयांतील वैद्यकीय समाजसेवकांचे कर्तव्य हे गरीब व गरजू रुग्णांना त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या सवलती व सुविधांची माहिती देणे हे आहे. तसेच दुर्घटनेची माहिती देऊन रुग्णांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करणे, प्रत्यारोपणासाठी रुग्ण असेल तर नातेवाईकांची त्यासाठी मानसिकता तयार करणे हे आहे. पण, यापैकी सर्वांत महत्त्वाचे काम हे गरीब रुग्णांना सवलतींची माहिती देणे आणि मार्गदर्शन करणे आहे. पण, सध्याच्या धर्मादाय रुग्णालयांतील वैद्यकिय समाजसेवक हे रुग्णांऐवजी रुग्णालयांच्या बाजूनेच काम करत असल्याचा आरोप रुग्णांकडून करण्यात येत आहे. ही वैद्यकिय समाजसेवक रुग्णांना सुविधा देण्याऐवजी ‘गरीब रुग्ण निधी’ जास्तीत जास्त कसा वाचवता येईल, या दृष्टिने कार्यरत असतात. गरजू रुग्णांशी योग्य संवाद साधत नाहीत. त्यांना नीटशी माहिती देत नाहीत. रुग्णालयांचा कसा फायदा होईल, याचीच त्यांना काळजी असल्याचे दिसून येते.  

समाजसेवा या विषयात पदव्यूत्‍तर पदवी (एमएसडब्ल्यू) घेतलेल्या उमेदवारांना रुग्णालयांत वैद्यकिय समाजसेवक म्हणून नियुक्‍ती करण्यात येते. अभ्यासक्रमांमध्येच समाजाशी (रुग्णांशी) संवाद कसा साधावा याचे शिक्षणही त्यांना दिले जाते. मात्र याच्या उलटच बहुतांश समाजसेवकांची वर्तवणूक असल्याचे दिसून येत आहे. धर्मादाय रुग्णालयांना निर्धन रुग्ण व आर्थिक दुर्बल घटक यातील रुग्णांसाठी प्रत्येकी 10 टक्के खाटा राखीव असतात. त्याद्वारे उपचार केले जाण्यासाठी पात्र रुग्णांना प्रथम त्या रुग्णालयांतील वैद्यकिय समाजसेवकांशी संपर्क साधावा लागतो. यावेळी, त्यांच्याकडे येणारे रुग्ण बहुतांश खेड्यातील, अशिक्षित असतात. यावेळी रुग्णांनी वार्षिक उत्पन्न तसेच रेशनकार्ड यांची कागदपत्रे दाखविली असल्यानंतरही त्यांच्यावरच प्रश्‍नांची सरबत्‍ती केली जाते. तुम्ही काय करता, घरी कोण असते, किती उत्पन्न आहे असे विचारून त्याला योजनेतून कसे ‘कटवता’ येईल यासाठी समाजसेवक त्यांचे कौशल्य पणाला लावत असल्याचे दिसून येत आहे. 

याबाबत एका वैद्यकीय समाजसेवकाला विचारले असता त्याने नाव न प्रसिध्द करण्याच्या अटीवर सांगितले की, रुग्णालयांकडे एकूण उत्पन्नांपैकी केवळ दोन टक्केच निधी खर्च करण्याचा नियम आहे. हा निधीच अपुरा तर रुग्ण मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे फार गरजवंत आणि गरीब रुग्णांनाच या योजनेचा लाभ देण्यात येतो. तसेच महिन्याकाठी ठराविक रकमेतच सुविधा देणे भाग असते. तसेच अनेक श्रीमंत रुग्णही कमी उत्पन्नाचा दाखला घेऊन येतात आणि सुविधा मागतात, त्यामुळे प्रश्‍न विचारावे लागतात.