Fri, Jan 18, 2019 10:52होमपेज › Pune › आला अधिक; करूया जावयाचा पाहुणचार

आला अधिक; करूया जावयाचा पाहुणचार

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 15 2018 11:21PMपिंपरी : प्रतिनिधी

शनिवारपासून लगीनघाई जरी थांबली असली तरी सोळा मे पासून अधिक मासारंभ होत आहे. तीन वर्षांतून एकदा येणारा जावयाच्या मानपानाचा हा महिना असल्याने बाजारात सासू सासर्‍यांची वस्तूखरेदीसाठी लगबग पहायला मिळत आहे. बुधवारपासून (दि.16) अधिक महिना सुरु होत असून महिनाभर म्हणजेच 12 जूनपर्यंत  नवीन कपडे, सुवर्णमुद्रा तसेच आगळ्यावेगळ्या भेटवस्तू देऊन समस्त जावयांचा पाहुणचार केला जाणार आहे. त्यामुळे अधिकमासानिमित्त सर्वत्र लगबग सुरु असल्याचे चित्र पहायला  मिळत आहे. 

हिंदू धर्मानुसार अधिकमासात दानपुण्य तसेच महिनाभर उपवास करण्याची जुनी परंपरा असल्याचे जाणकारांचे मत आहे. या महिन्यात प्रामुख्याने श्राध्द, स्नान व दान ही तीन कर्म केली जातात. या महिन्यात पूर्वजांचे आशिर्वाद मिळतात. त्यामुळे या महिन्याला अधिक महत्व आहे. दर तीन वर्षांनी एक महिना अधिक येतो म्हणून त्याला अधिकमास म्हटले जाते, अशी माहिती पुरोहितांनी दिली. या महिन्यात दान सर्वश्रेष्ठ समजले जाते. तसेच जावयाला विष्णूचे रुप समजले जाते म्हणून या काळात जावयाला विविध वस्तू देऊन यथोचित पाहूणचार केला जातो.

जावयाला समजले जाते विष्णूचे रूप

जावयाला विष्णुचे रुप समजले जाते. म्हणून अधिक मासात जावयाचा साग्रसंगीत पाहुणचार केला जातो. सुवर्णमुद्रा तसेच चांदीच्या किंवा तांब्याच्या ताटात धोंडे ठेवून त्यावर दिवा ठेवला जातो व तो जावयाला दिला जातो. पुरणपोळी व पंचपक्वान्नाचे जेवणही दिले जाते. त्यामुळे या महिन्याला धोंड्याचा महिना असेही काही भागात म्हटले जाते, अशी माहिती चिंचवड येथील सचिन काळे गुरुजी यांनी दिली.