होमपेज › Pune › गुंडाला आश्रय देणारे चौघे अटकेत

गुंडाला आश्रय देणारे चौघे अटकेत

Published On: Jun 03 2018 1:18AM | Last Updated: Jun 03 2018 12:46AM



पुणे : प्रतिनिधी 

लग्नाच्या आमिषाने प्रेमसंबंध स्थापित करून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍या सराईताला आश्रय देणार्‍या चौघांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. चौघांनी अल्पवयीन मुलगी आणि गुंडाला पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे गावातील फार्म हाऊसमध्ये आश्रय दिला होता; मात्र पोलिसांचे पथक तेथे पोहोचण्यापूर्वीच तो मुलीला घेऊन पसार झाला आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. 

किरण अशोक इंदलकर (रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता), कमलेश संपत भगत (रा. तोरणा प्रांगण, वडगाव धायरी), चेतन विजय खेडेकर (रा. कल्पतरु कॉलनी, वारजे जकात नाका), लक्ष्मण आनंदा राऊत (रा. रासकर बिल्डिंग, पवार हॉस्पिटलमागे, बालाजीनगर, धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मंगळवारपेठ परिसरातील सराईत गुंड श्वेतांग निकाळजे याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला 7  एप्रिल रोजी पळवून नेले. मुलीच्या वडिलांनी याबाबत फरासखाना पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्यांनी याबाबत उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

मुलीचे अपहरण करणार्‍या निकाळजेचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. यादरम्यान  मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने निकाळजेचा व्यावसायिक भागीदार इंदलकर, भगत, खेडेकर, राऊत यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी प्राथमिक तपासात त्यांनी निकाळजेसह मुलीला चेतन खेडेकर याच्या पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे गावातील फार्म हाऊसमध्ये लपवून ठेवल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने तेथे रवाना करण्यात आले. मात्र पोलिस पोहोचण्यापूर्वी निकाळजे मुलीला घेऊन तेथून पसार झाला.

त्यानंतर त्याला आश्रय देणार्‍या चौघांना पोलिसांनी अटक केली. निकाळजे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा,चोरी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे,  उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम, सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, विद्यूल्‍लता चव्हाण, यशवंत आंब्रे, विनायक पवार, शंकर पाटील, अजय थोरात, परवेझ जमादार, निलेश पाटील, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन गायकवाड यांच्या पथकाने केली.