होमपेज › Pune › टाटा मोटर्सच्या कामगारांना श्रम पुरस्कार

टाटा मोटर्सच्या कामगारांना श्रम पुरस्कार

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 03 2018 11:51PMपिंपरी : प्रतिनिधी 

टाटा मोटर्समधील पाच कामगारांना पंतप्रधान श्रम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्‍ली येथील विज्ञान भवन येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गजेंद्र निंबाळकर, राकेश देशमुख, डॉ. वसंत भांदुर्गे, कैलास माळी व मनोजकुमार आणेकर आदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गजेंद्र निंबाळकर हे 26 वर्षांपासून एपीडी विभागात कार्यरत होते. ते सध्या वर्ल्ड क्‍लास क्‍वॉलिटी या विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत टाटा मोटर्सने त्यांना मॅन ऑफ द मंथ, डिव्हिजनल मॅन ऑफ द इयर, टाटा मोटर्स मॅन ऑफ द इअर हे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. 

राकेश देशमुख हे टाटा मोटर्समधील फौंड्री या विभागात 24 वर्षे वेल्डर या पदावर कार्यरत आहेत. या कामात सतत सुधारणा, गुणवत्तेमध्ये सुधारणांसाठी नावीन्यपूर्ण कल्पना या कंपनीस त्यांनी दिलेल्या आहेत. त्यांना कामाचा मोबदला म्हणून 11 वे नॅशनल गोल्ड मेडल मिळालेले आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘गुणवंत कामगार पुरस्कार’ही मिळाला आहे. 

डॉ. वसंत भांदुर्गे हे पिंपरी येथील टाटा मोटर्सच्या गिअर फॅक्टरी डिव्हिजनमध्ये मेंटेनन्स इलेक्ट्रिशिअन या पदावर 25 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी कामामधील सुरक्षितता व गुणवत्ता, उत्पादक खर्चात बचत यामधील जागरुकता; तसेच उच्चतम उत्तम कामगिरी केलेली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पंतप्रधान श्रम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  

कैलास माळी हे पिंपरी येथील टाटा मोटर्सच्या गिअर फॅक्टरी डिव्हिजनमध्ये गेली 24 वर्षे मेंटेनन्स इलेक्ट्रिशिअन म्हणून कार्यरत असून, ते हिट ट्रिटमेंटमधील फर्जेसचे ब्रेकडाऊन मेंटेनन्स, शट डाऊन मेंटेनन्स, गुणवत्तेशी निगडित सर्व उपकरणांचे कॅलिब्रेशन, सुरक्षितता, गुणवत्ता, पर्यावरणसंवर्धन आदींबाबत जागरुकता यासंदर्भात नावीन्यपूर्ण काम केलेले आहे. 

मनोजकुमार आणेकर हे ईआरसी डिव्हिजनमध्ये ऑटो मेकॅनिक म्हणून कार्यरत आहेत. सतत नावीन्यपूर्ण संशोधनात ते नेहमी कार्यरत असून, त्यांना सुरक्षितता, गुणवत्ता या बाबतीत नेहमीच विविध सूचना दिलेल्या आहेत. कंपनी पर्यावरण संवर्धनाबाबत ते नेहमीच जागरुक असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्काराने सन्मानित केले.