Sat, Apr 20, 2019 09:56होमपेज › Pune › मधपेट्यांना प्रतीक्षा मधमाशांची

मधपेट्यांना प्रतीक्षा मधमाशांची

Published On: Jan 25 2018 11:05PM | Last Updated: Jan 25 2018 11:05PMपुणे : शंकर कवडे

श्‍वेतक्रांतीनंतर मधक्रांतीच्या दिशेने पाऊल ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या ‘हनी मिशन’ला सातेरी मधमाशांच्या तुटवड्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे. केंद्रीय मधमाशा संशोधन व प्रशिक्षण केंद्राकडे मधपेटी वितरणासाठी सातेरी मधमाशा नसल्याने, गेल्या आठ दिवसांपासून मधपेट्या वितरणाचा कार्यक्रम रखडला आहे. परिणामी, शेतीला पर्यायी जोडधंदा म्हणून मधउत्पादनाकडे आशेने पाहणार्‍या लाभार्थी शेतकर्‍यांना शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

मध उत्पादनाकडे शेतकर्‍यांना आकर्षित करून उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या वतीने तब्बल 1 लाखांहून अधिक मधपेट्या विकसित करण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत शिवाजीनगर येथील केंद्रीय मधमाशा संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये, आकर्षक घराच्या आकाराच्या असलेल्या नवीन अत्याधुनिक पेट्या दाखल झाल्या आहेत. योजनेअंतर्गत अवघे 1 हजार 500 रुपये डिपॉझिट भरून मधपेटीसह सातेरी जातीच्या मधमाशा, मध काढतेवेळी तोंडावर लावण्यात येणारी जाळी, धुर फवारणी, हातमोजे यासह पेटी ठेवण्यासाठी स्टॅण्ड आदी साहित्य दिले जाणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील 70 ते 80 टक्के पुरूषांनी नोंदणी केली असून, उर्वरित महिला शेतकर्‍यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातून तब्बल 60 शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. तर 20 लाभार्थी वेटिंग वर आहेत. मात्र, केरळहून सातेरी जातीच्या मधमाशा न आल्याने लाभार्थी शेतकर्‍यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात योजनेअंतर्गत केंद्रात 150 नवीन मधपेट्या उपलब्ध झाल्या आहेत. तर, येत्या काही दिवसांमध्ये त्यामध्ये 450 मधपेट्यांची भर पडणार आहे. मात्र, अद्याप सातेरी मधमाशा केंद्राकडे न आल्याने स्वीट क्रांतीला खिळ बसल्याचे चित्र दिसून येत आहे.