Mon, Mar 25, 2019 17:29होमपेज › Pune › घरे नियमित केल्याशिवाय कोणताही कर भरणार नाही

घरे नियमित केल्याशिवाय कोणताही कर भरणार नाही

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 14 2018 10:50PMपिंपरी : प्रतिनिधी 

सत्तेत येताच शास्तीकर पूर्णपणे माफ करू म्हणणारे भाजप-सेना सरकार आश्‍वासन विसरले आहे. हे सरकार शास्तीकर न भरलेल्या सर्वसामान्यांना घरांच्या; तसेच मिळकतींच्या जप्तीच्या नोटिसा पाठवत आहे. ते आता आम्ही सहन करणार नाही. कार्यवाहीसाठी येणार्‍या बेजबाबदार आधिकार्‍यांनाही धडा शिकवू. जोपर्यंत आमची हक्‍काची घरे नियमित होणार नाहीत, तोपर्यंत कोणताही कर भरणार नाही, असा निर्णय घर बचाव समितीने घेतला आहे.

घर बचाव समितीची बैठक नुकतीच पार पडली. या वेळी हा निर्णय घेण्यात आला. स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीचे समन्वयक धनाजी येळकर पाटील, भालचंद्र फुगे, देवेंद्र भदाने, मनोज पाटील, रामचंद्र ढेकळे, रामलिंग तोडकर, सिद्दिक शेख, सतीश नारखेडे, दीपक तरडे, गुलजार शेख, राजेंद्र देवकर, गणेश सरकटे, अतुल वर्पे, सूरज ठाकर, सचिन आल्हाट, यशवंत उबाळे, राजू पवार, राजश्री शिरवळकर, सुनीता फुले, नैना नारखेडे, अर्चना मेंगडे, सुरेखाताई बहिरट आदी या वेळी उपस्थित होते.

कालबाह्य झालेला रिंग रेल्वेचा विषय रिंग रोडच्या नावाने 33 वर्षांत विकसित न केलेला रिंग रेल्वे प्रकल्प बेकायदेशीर आहे. प्रकल्पाची पूर्ण जागा महापालिका व प्राधिकरण प्रशासनाच्या ताब्यात नसताना, कोटींची उड्डाणे ही 2019 च्या निवडणुकीची तयारी आहे,  म्हणून आम्ही फसव्या सरकारच्या विरोधात रक्‍तरंजित लढा झाला तरी चालेल, असा निर्धार केला आहे. प्रत्येक वेळी प्राधिकरणातील अनधिकृत बांधकामे; तसेच शास्तीकराच्या प्रश्‍नांचे निवडणुकीत राजकारण होते. भाजप-सेनेच्या जाहीरनाम्यात हा विषय होता; परंतु जाणीवपूर्वक जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न सोडवला गेला नाही. सर्वसामान्यांची घरे उद्ध्वस्त करणार्‍या बेजबाबदार भाजप-सेना युतीच्या विरोधात जनजागृती मोहीम स्वाभिमानी घर बचाव संघर्ष यात्रेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.

30 ते 35 वर्षे ज्या नेत्यांनी आमच्या हक्‍काच्या घरांचे राजकारण केले, त्यांना परत 2019 च्या निवडणुकीत या विषयाचे राजकारण करू देणार नाही. या प्रश्‍नाचे परत राजकारण झाल्यास जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशा तीव्र भावना बाधित महिलांनी या वेळी व्यक्‍त केल्या.

22 मार्चपासून संघर्ष यात्रा

स्वाभिमानी घर बचाव संघर्ष यात्रेची सुरुवात गुरुवार, दि. 22 मार्च 2018 रोजी थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकाळी 11 वाजता होणार आहे. प्रत्येक प्रभागात जनजागृती करून आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल, असेे या बैठकीत ठरविण्यात आले.