होमपेज › Pune › होळीचे सोंग आणि मुखवटे झाले इतिहासजमा 

होळीचे सोंग आणि मुखवटे झाले इतिहासजमा 

Published On: Mar 01 2018 1:29AM | Last Updated: Mar 01 2018 1:15AMदेहूरोड : उमेश ओव्हाळ

होळी रे होळी...पुरणाची पोळी... अशा धम्माल अरोळ्या देताना होळीचा सण चाळींमध्ये एका कुटूंबाप्रमाणे साजरा करण्याची मजा केव्हाच कालबाह्य झाली आहे. खरेतर हा सण साजरा करण्याच्या अनेक परंपरा आहेत. होळीभोवती फेर धरत गाणी, गप्पा-गोष्टी, कलागुणांचे सादरीकरण आदी प्रकारांमुळे हा सण खरेतर अबालवृध्दांचा आवडता; तसेच प्राण्यांचे मुखवटे चढवून सोंग घेत  निःसंकोच बोंब मारताना वय विसरायला लावणारा हा सण अलिकडच्या काळात मात्र काहीसा निरस होत चालला आहे; तसेच होळी सणातली सोंगे आणि मुखवटे आता इतिहासजमा झाले आहेत.  

होळीच्या सणाला जेवढे धार्मिक महत्व आहे, त्यापेक्षा तो पारंपारिक रितीने साजरा करण्यातील आनंद वेगळा आणि विरळाच. प्रत्येक धर्मातील माणूस हा सण साजरा करताना दिसतो. मात्र, अलिकडच्या काळात त्यातील रंगत कमी होत चालली आहे. पुर्वी होळीच्या सणाला सोंग काढून एखाद्याची खिल्ली उडवणे, सामाजिक संदेश देणे, बाया-मुलांना भिती दाखविणे आदी प्रकार केले जात असत. त्यासाठी सणाच्या महिनाभरापुर्वीच विविधप्रकारचे मुखवटे बाजारपेठेत विक्रिसाठी येत असत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भुरळ घालणारे हे मुखवटे केव्हाच बाजारपेठेतून हद्दपार झाले आहेत. 

केवळ मुखवटेच नव्हेतर सोंग काढण्याचा प्रघातही बंद पडला आहे. आता केवळ पुरणपोळचिा नैवेद्य दाखविणे, एखादी फेरी मारणे, जमलेच तर एखादी बोंब (ती ही नाईलाजास्तव) ठोकणे एवढ्या सोपस्कारांवर होळीचा सण सिमीत झाला आहे. धुलीवंदनाला एकमेकांना चिखलाने रंगवले जायचे. एका अर्थाने ती मातीशी नाते टिकवून ठेवणारी परंपरा होती. हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे रंग, फुगे, रासायनिक रंग, वापरून धुलीवंदन साजरे करण्याची टूम निघाली आहे. काही लोक मित्रांची जमवाजमव करून निसर्गाच्या सानिध्यात ओल्या पार्ट्यांचे बेत अखताना दिसतात. सण साजरे करण्याची ही नवीन पद्धत सार्वजनिक शांतता बिघडवते; शिवाय कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करण्यास कारणीभूत ठरताना दिसते.