Tue, Apr 23, 2019 18:10होमपेज › Pune › मोशी रस्त्यावर होर्डिंग्जचा भडिमार

मोशी रस्त्यावर होर्डिंग्जचा भडिमार

Published On: May 15 2018 1:32AM | Last Updated: May 14 2018 11:49PMमोशी : श्रीकांत बोरावके 

मोशी (ता. हवेली) गावच्या सौंदर्यात बाधा निर्माण होणारी अनेक अनधिकृत कामे परिसरात भरभराटीस आली असून, येथील रस्त्यांवर उभे राहात असलेले अनेक जाहिरात व्यावसायिक कंपन्यांचे अनधिकृत जाहिरात फलक हे त्याचे ताजे उदाहरण आहे असेच म्हणता येईल. अगोदरच कचरा डेपोच्या समस्येने ग्रस्त असलेल्या मोशीकरांच्या गावपणाची ओळखच पुसली जात असून पालिकेच्या दुर्लक्षामुळे त्याचा नाहक भडिमार स्थानिकांवर होत आहे. अनधिकृत असले तरी जागामालकांचा रोष नको यासाठी यावर कोणी जाहीररीत्या बोलताना दिसून येत नाही.                

शासनाच्या वतीने अनधिकृत फ्लेक्स, जाहिरात होर्डींग्सवर कारवाई करण्याचे आदेश वारंवार देण्यात आले आहेत. मात्र, पालिकेच्या वतीने त्या निर्णयाला वाटण्याच्या अक्षता दाखविण्यात आल्याचे चित्र मोशी परिसरात उभारण्यात आलेल्या अनधिकृत फलकांच्या संख्येवरून दिसून येत आहे. मोशीमध्ये राजा शिवछत्रपती चौक, बोर्‍हाडेवाडी चौक, गावठाण मुख्य चौक, देहू फाटा चौक, देहू-आळंदी रस्ता, पुणे -नाशिक महामार्गालगत मोठ -मोठ्या जाहिरातदार कंपन्यांनी अनधिकृत फ्लेक्स उभारले आहेत. त्यांची रचना ही नियमांमध्ये नसून दर्शनी भागात जाहिरात फलक दिसावे या धडपडीत शहराला बकालपणाचे स्वरूप येत आहे. परिसरातील शेतकरी, जागा मालक यांच्याकडून वर्षभराच्या करारावर जागा भाड्याने घेऊन जाहिरात व्यावसायिक कंपन्यांनी होर्डीग्स उभारले आहेत. 

वर्षाकाठी 50 हजार ते लाखो रुपये जागेचे भाडे घेऊन जागा मालक आपली जागा भाड्याने देत आहेत. अशाप्रकारे जाहिरात फलक लावण्यात आल्याचे प्रमाण मोशी भागात अधिक आहेत. असे फलक उभारताना सर्व नियम धाब्यावर बसविले जात असून झाडांची कत्तल केली जात आहे. आकाशचिन्ह विभागाकडून याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. मोशीला या फलकांमुळे बकालपणाचे स्वरूप येत असताना प्रशासन ढिम्म का, असा प्रश्न ग्रामस्थांकडून केला जात आहे.

विजेचे खांबही व्यापले फलकांनी  

जाहिरात फलकांना जागा देऊन झालेले विद्रूपीकरण कमी पडत होते की काय म्हणून आता जाहिरातवाल्यांकडून विजेचे खांब देखील लक्ष केले जात असून एकाच पोलवर तीन, चार फलक धोकादायक अवस्थेत लटकवलेले दिसून येतात. या फलकांबाबत पालिका पूर्णपणे डोळेझाक करत असल्याचे दिसून येते.